फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ातच उत्तर भारतातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. तापमान वाढीमुळे गव्हाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने तातडीने समितीची स्थापना करून तापमान वाढीचा परिणाम काय होईल, याचा अभ्यास करण्याचे आदेश दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रीय पीक पूर्वअंदाज केंद्राने (एनसीएफसी) फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ातच उत्तर भारतात तापमान सरासरी ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते, त्याचा परिणाम म्हणून अंतिम टप्प्यात असलेल्या गव्हाच्या पिकावर होऊन उत्पादनात घट येण्याचा अंदाज व्यक्त केला होता.मध्य प्रदेशाचा अपवाद वगळता उत्तर भारतात फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ातील तापमान मागील सात वर्षांच्या सरासरीपेक्षा अधिक असल्याचे निरीक्षणही केंद्राने नोंदविले आहे. त्यासह गुजरात, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता.

या बाबत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव मनोज आहुजा म्हणाले,की तापमान वाढल्यानंतर सूक्ष्म सिंचनाद्वारे गव्हाला पाणी देण्याचे निर्देश शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. तापमान वाढीचा कल लक्षात घेऊन पुढील काळात गव्हाची लागवड लवकर करणे, कमी दिवसांत तयार होणाऱ्या गव्हाची लागवड करणे आणि तापमान वाढीचा परिणाम न होणाऱ्या गव्हाच्या वाणांचा विकास करून त्याची लागवड करणे आदी पर्यायांवर गांभीर्याने विचार सुरू आहे.

यंदा गहू उत्पादनाची स्थिती काय?
२०२२-२३च्या यंदाच्या हंगामात देशाचे गहू उत्पादन ११.२१ कोटी टन होण्याचा केंद्र सरकारचा अंदाज आहे. मागील वर्षी काही गहू उत्पादक राज्यांमध्ये तापमान वाढ झाली होती, त्याचा परिणाम म्हणून गहू उत्पादनात घट होऊन उत्पादन १० कोटी ७७.४ लाख टन झाले होते. त्याचा परिणाम निर्यात आणि दरवाढीवर झाला होता.

तापमान वाढीचा गव्हाच्या उत्पादनावर काय परिणाम होईल, याचा अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत कृषी मंत्रालयाचे अधिकारी, कर्नाल येथील गहू संशोधन केंद्रातील संशोधक आणि संबंधित राज्यांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. – मनोज आहुजा, सचिव, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First week of february there is a big increase in temperature in north india amy
Show comments