पुणे : शहरात झिका आजाराचा यंदा पहिला रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण येरवड्यातील प्रतीकनगरमध्ये सापडला असून आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत.

झिकाचा संसर्ग झालेली ६४ वर्षांची महिला आहे. काही दिवसांपूर्वी पिंपरी- चिंचवडमध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम झाला होता. त्याला या महिलेने हजेरी लावली होती. त्यानंतर तिला ताप आला आणि अंगदुखीचा त्रास होऊ लागला. तिला पुण्यातील खासगी रुणालयात दाखल करण्यात आले. तिच्या तपासणीत अखेर झिकाचे निदान झाले. दरम्यान, पिंपरी- चिंचवडमधील सांस्कृतिक कार्यक्रमाला केरळमधील अनेक जण उपस्थित होते. त्यातील एखाद्या बाधित व्यक्तीकडून या महिलेला संसर्ग झाला असू शकतो, असे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले.

आणखी वाचा-विद्यापीठात राड्यानंतर आता सलोखा! पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत विद्यार्थी संघटनांमध्ये होणार समेट

या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. प्रतापसिंह सारणीकर यांनी झिका रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी प्रतिक नगर येरवडा येथे प्रत्यक्ष रुग्णाची भेट घेतली. रुग्णाची विचारपूस करून तब्येतीची काळजी घेण्यास सांगण्यात आले. त्याचप्रमाणे पुणे महापालिकेच्या कर्मचा-यांना झिका रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याचे आदेश देण्यात आले.

येरवड्यात झिकाचा रुग्ण आढळला आहे. रुग्णाच्या कुटुंबातील इतर सदस्यांना कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. तरीही खबरदारी म्हणून रुग्णाच्या कुटुंबातील पाच सदस्यांचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडे पाठविण्यात आले आहेत. -डॉ. प्रतापसिंह सारणीकर, सहसंचालक, आरोग्य विभाग

Story img Loader