पुणे : मासळी बाजरात ओले बोंबील, कोळंबी, बांगड्याची आवक वाढली असून दरात घट झाली आहे. त्यामुळे आता मासेप्रेमी खवय्यांची चंगळ होणार आहे.
मासे बाजारात पापलेट, रावस, सुरमई या मासळीचे दर टिकून आहेत. इंग्लिश अंड्यांच्या दरात शेकड्यामागे २५ ते ३० रुपयांनी वाढ झाली आहे. मासे बाजारात माशांची आवक चांगली होत असून त्या तुलनेत मागणी कमी असल्याने दरात घट झाल्याची माहिती मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.
हेही वाचा – पुणे : गृहिणींच्या बजेटवर ताण, पालेभाज्या महागल्या
चिकन, मटण, गावरान अंड्यांचे दर स्थिर आहेत. गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळी १० ते १२ टन, खाडीतील मासळी १०० ते १५० किलो, नदीतील मासळी एक ते दीड टन, तसेच आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळीची मिळून १५ ते २० टन आवक झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.