लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : बनावट कागदपत्रांसह बेकायदा राहणाऱ्या पाच बांगलादेशी घुसखोरांना दहशत विरोधी पथकाने भोसरीतील शांतीनगर येथून अटक केली. त्यांच्याकडून बनावट आधार कार्ड, जन्माचे दाखले, शाळा सोडल्याचे दाखले आणि पारपत्र जप्त करण्यात आले आहे.
शामीम नुरोल राणा (वय २६), राज उर्फ सम्राट सदन अधिकारी (वय २७) जलील नुरू शेख उर्फ जलील नूर मोहम्मद गोलदार (वय ३८), वसीम अजीज उलहक मंडल उर्फ वसीम अजीजऊल हक हिरा (वय २६) आणि आझाद शमशुल शेख उर्फ मोहंमद अबुल कलाम शमशुद्दिन फकीर (वय ३२) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना बनावट कागदपत्रे बनवून देणाऱ्या अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहशत विरोधी पथकाचे पोलीस शिपाई सुयोग लांडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी हे बांगलादेशी नागरिक असून त्यांच्याकडे कोणताही परवाना नसताना राहत होते. ते दोन्ही देशांच्या सीमेवरील मुलकी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय घुसखोरीच्या मार्गाने आले. बनावट आधार कार्ड, जन्माचे दाखले, शाळा सोडल्याचे दाखले आणि पारपत्र बनवून शांतीनगर येथे भारतीय नागरिक असल्याचे भासवून राहत होते. शांतीनगर येथील ओम क्रिएटीव्ह टेलर्स या कंपनीत ते काम करीत होते. याबाबत दहशतविरोधी पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार, त्यांनी छापा टाकून पाचही बांगलादेशींना अटक केली. फौजदार केंद्रे तपास करीत आहेत.