पुणे :  आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या पाच माजी नगरसेवकांनी भाजप मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे पक्षाचे हे नगरसेवक आज (मंगळवार) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबई येथे हा कार्यक्रम होणार आहे. या पाच जणांनी पक्षाची साथ सोडल्याने पुण्यात शिवसेना (ठाकरे) पक्षाला धक्का मानला जात आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या पाच जणांमध्ये दोन माजी  नगरसेवक आणि तीन माजी नगरसेविकांचा समावेश आहे. माजी नगरसेवक विशाल धनवडे, पल्लवी जावळे, बाळा ओसवाल, प्राची अल्हाट, संगीता ठोसर अशी या माजी नगरसेवकांची नावे आहेत. हे माजी नगरसेवक मंगळवारी मुंबई येथे भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या उपस्थितीत तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत.

हेही वाचा >>> बिबवेवाडीत तरुणांवर कोयत्याने वार; पोलिसांकडून दोघांना अटक

शिवसेना (ठाकरे) पक्षांमध्ये वरिष्ठांकडून होत असलेली घुसमट, वरिष्ठांकडून पुण्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे पक्षाला सोडचिठ्ठी देऊन आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आणि केंद्रात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाची वाट या माजी नगरसेवकांनी धरल्याचे बोलले जात आहे. या पाच नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशांमुळे शहर भाजपची ताकद वाढणार असली तरी भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये यामुळे नाराजी पसरली आहे. पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून महापालिकेत बाहेरून आलेल्यांना संधी देऊ नका अशी भूमिका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.

हेही वाचा >>> आरोग्य विभागाचे खासगी रुग्णालयांवर ‘लक्ष’! राज्यभरात नियमभंग शोधून कारवाईची मोहीम

विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविणाऱ्या भाजप, शिवसेना (शिंदे) राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला मोठे यश मिळाले. महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविणाऱ्या काँग्रेस, शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला पराभवाचा मोठा धक्का बसला. शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या वरिष्ठांकडून पक्ष वाढीसाठी कोणतेही निर्णय घेतले जात नसल्याचा आरोप करून यातील दोन माजी नगरसेवकांनी पक्ष सोडत असल्याचे मागील आठवड्यात जाहीर केले होते. सोशल मीडिया अकाउंट वरून या नगरसेवकांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर दोन दिवसांमध्येच यातील तीन नगरसेवकांना पक्षातून बडतर्फ केल्याचे शिवसेना ठाकरे पक्षाने जाहीर केले होते.

शिवसेनेत तीन वर्षांपूर्वी पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देऊन आठ माजी नगरसेवकांनी शिवसेना (ठाकरे) पक्षात राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यातील पाच जण शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. पुण्यात शिवसेनेला (ठाकरे) कोणीही वाली नाही. जिल्ह्यात पक्षालाच शिवसेना नकोय असे वाटायला लागले. ना लोकसभेला जागा, ना विधानसभेला. जागा मिळाली, तरी उमेदवाराच्या मागे कोणतीही ताकद द्यायची नाही, कोणतीही रसद पुरवायची नाही. ना कोणत्या शिवसैनिकाला मदत करायची. शिवसैनिकांच्या सुख-दुःखात सहभागी व्हायचे नाही. ज्यांना पक्ष वाढविण्याची भूक आहे, त्याला काम करू न देणे हे गेली पाच वर्षे सुरू आहे. पक्षात जे नगरसेवक आहेत ते पक्ष वाढवायचे सोडून केवळ पायात पाय घालण्याचे काम चालू आहे. पक्ष वाढविण्याासाठी पाच वर्षात एकही बैठक झाली नाही, असा आरोप या माजी नगरसेवकांकडून केला जात होता.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five former corporator of shiv sena thackeray group likely to join bjp ahead of pmc poll pune print news ccm 82 zws