पुणे : पुणे पोलिसांच्या परिमंडळ पाचमधील पाच गुंडांना शहरातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यचे आदेश परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांनी दिले. गेल्या दोन महिन्यात या भागातील सहा आरोपींना तडीपार करण्यात आले आहे.
किशोर अमर सोळंकी (वय २१, रा. हडपसर), अक्षय अनिल पवार (वय २७, रा. हडपसर) कादीर उर्फ काजू आरिफ अन्सारी (वय २१, रा. कोंढवा खुर्द), साहील रफीक कलादगी (वय २१, रा. बिबवेवाडी), करण हरीदास जाधव (वय २४, रा. मुंढवा) अशी तडीपार करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत. शहरातील गु्ंडांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पुणे पोलिसांच्या परिमंडळ पाचमधील हडपसर, मुंढवा, कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराइतांविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांच्याकडे पाठविण्यात आला होता.
प्रस्तावाची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर उपायुक्त शिंदे यांनी एकाचवेळी पाच आरोपींना तडीपार केले. पाचही आरोपी सराइत असून त्यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. दोन महिन्यात परिमंडळ पाचमधील सहा सराइत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. या भागातील शंभरहून अधिक सराइतांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.