लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : मेफेड्रोन विक्रीतून मिळालेल्या पैशांतून ललित पाटील, त्याचा भाऊ भूषण यांनी सोने, तसेच जमीन खरेदीत पैसे गुंतविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. ललितकडून पुणे पोलिसांनी पाच किलो सोने जप्त केले आहे. यापूर्वी ललितचा साथीदार भूषण याच्या नाशिक येथील घरातून तीन किलो सोने जप्त करण्यात आले होते.
अमली पदार्थ विक्री प्रकरणात ललितसह १४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात आतापर्यंत ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ललितचे साथीदार समाधान बाबाजी कांबळे (रा. नाशिक), इम्रान शेख उर्फ आमिर खान (रा. धारावी, मुंबई), हरिष पंत (रा. मुंबई) यांना अटक करायची आहे. ललितला चाकणमध्ये मेफेड्रोन बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर येरवडा कारागृहात ठेवण्यात आले. कारागृहातून तो उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल झाला होता. नाशिकमधील शिंदे गावात श्री गणेशाय इंडस्ट्रीज नावाने सुरू करण्यात आलेल्या कारखान्यात ललित आणि साथीदार मेफेड्रोन तयार करत होते. मेफेड्रोन निर्मिती, तसेच वितरणाची जबाबदारी आरोपींवर होती.
आणखी वाचा-पुण्यातून विदेशी मद्याची तस्करी..! एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त
ललितला शिवाजीनगर न्यायालयाने ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलिसांकडून ललिल, साथीदार शिवाजी शिंदे, राहुल पाठक यांची चौकशी पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. गुरुवारी (२ नोव्हेंबर) पुणे पोलिसांचे पथक ललित घेऊन नाशिकला तपासासाठी घेऊन गेले. ललितकडून पोलिसांनी पाच किलो सोने जप्त करण्यात आले.
ललितसह साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई
ललितसह साथीदारांविरुद्ध पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत.