नगर-कल्याण महामार्गावर आळे येथील अपघात
नारायणगाव : विवाह सोहळाच्या पूर्वतयारीसाठी आपल्या गावाकडे चाललेल्या शेतमजुरांच्या दुचाकीला भरधाव वेगातील पिकअप टेम्पोने धडक दिल्यामुळे दुचाकीवरील एकाच कुटुंबातील पाच जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाले. नगर-कल्याण महामार्गावर आळेजवळील लवणवाडी येथे सोमवारी (२७ मार्च) रात्री साडेनऊ वाजता ही दुर्घटना घडली. या भीषण अपघातातील मृतांमध्ये दोन चिमुरड्या मुलांचा समावेश आहे.
नितीन शिवाजी मधे (वय २३) सुंदरा उर्फ सुनंदा रोहित मधे (वय २४) गौरव रोहित मधे (वय ४) आर्यन सुहास उर्फ यमा मधे (वय दीड वर्ष) सुहास उर्फ यमा ठमा मधे (वय २५) अशी अपघातातील मृत व्यक्तींची नावे असून हे सर्वजण पारनेर तालुक्यातील (जि. नगर) पळशी नागापूरवाडी येथील एकाच कुटुंबातील रहिवासी आहेत. आळेफाटा पोलिस ठाण्यात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा >>> पुणे: भरधाव वाहनाच्या धडकेने सायकलस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणगाव परिसरात शेतमजूर करण्यासाठी आलेले मधे कुटुंबीय हे गावाकडे लग्नाची पूर्वतयारी करण्यासाठी दुचाकीवरून नारायणगावकडून आळेफाटा मार्गे नगर-कल्याण महामार्गाने जात होते. आळेफाटा चौकापासून दोन किलोमीटर अंतरावरील लवणवाडी येथे बेल्हा बाजूने आळेफाटा येथून भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप टेम्पोने विरुद्ध बाजूला येऊन दुचाकीला जोरात धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील नितीन मधे, सुंदरा उर्फ सुनंदा मधे, गौरव मधे, आर्यन मधे हे जागीच ठार झाले. तर सुहास उर्फ यमा मधे आणि अर्चना मधे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी आळेफाटा येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नगर येथे दाखल करण्यात आले. रोहित मधे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आळेफाटा पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून टेम्पोचालक मयूर संतोष आनंद (रा. कळस, ता. पारनेर) याला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर पुढील तपास करत आहेत. अपघातानंतर जुन्नर उपविभागीय अधिकारी मंदार जावळे आणि पोलीूस निरिक्षक यशवंत नलावडे यांनीही घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.