पुणे : लोणावळा येथे डोंगराळ भागातील धबधब्यावर पावसाचा आनंद घेणे कुटुंबाच्या जीवावर बेतले आहे. पुण्यातील हडपसर येथील पाच जण धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर, दोघांचा शोध सुरू आहे. रात्र झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले आहे. साहिस्ता लियाकत अन्सारी वय- ३६ वर्षे, अमिमा सलमान उर्फ आदिल अन्सारी वय- १३ वर्षे, उमेरा सलमान उर्फ आदील अन्सारी वय- ८ वर्षे या तिघांचा मृत्यू झाला आहे. या तिघांचा मृतदेह मिळाला आहे. अदनान अन्सारी वय- ४ वर्षे आणि मारिया अन्सारी वय- ९ वर्षे या दोघांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील हडपसर भागातून लियाकत अन्सारी आणि युनूस खान हे त्यांच्या १७ ते १८ कुटुंबातील सदस्यांसोबत लोणावळ्यात वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी गेले होते. दोन्ही कुटुंब हे हे दुर्गम भागातील धबधब्यावर गेले होते. हा धबधबा भुशी धरणाच्या पाठीमागे आहे. डोंगराळ भागात असल्याने तिथे कोणी जाण्याचा प्रयत्न करत नाही. खान आणि अन्सारी दोन्ही कुटुंब एकमेकांसोबत वर्षाविहाराचा आनंद घेत होते. गेल्या दोन- तीन दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या पावसामुळे अचानक ज्या धबधब्याच्या पाण्यात हे कुटुंब थांबले तिथं अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. त्या पाण्याच्या प्रवाहात दहा जण अडकले. पैकी, ५ जण पाण्याच्या प्रवाहातून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. पण पाच जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. पैकी तिघांचा मृतदेह मिळाला आहे. दोघांचा शोध सुरू आहे.

आणखी वाचा-पालखी सोहळ्यात शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी गजर, काय आहे नियोजन ?

पोलिसांनी पर्यटकांना केले हे आवाहन

लोणावळा, खंडाळा भागात वर्षाविहारासाठी येणाऱ्या पर्यटकांनी अनोळखी ठिकाणी जाऊ नये. आपला आणि आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नये. भुशी डॅम परिसर, घुबड तलाव, टाटा डॅम, तुंगार्ली डॅम, राजमाची पॉईंट, भागात पर्यटकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे अस लोणावळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी आवाहन केले आहे.

भुशी धरणाच्या पाठीमागे डोंगरात वाहतात अनेक धबधबे

भुशी धरणाच्या पाठीमागे डोंगर आहे. त्या डोंगरातून अनेक धबधबे वाहतात. धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह थेट भुशी धरणाच्या तलावात येतो. भुशी धरण देखील आजच ओव्हर फ्लो झाला असून रविवारचा दिवस असल्याने अनेक पर्यटकांनी भुशी धरण्यावर गर्दी केली होती या भुशी धरणावर देखील अनेक पर्यटक हे हुल्लडबाजी करतात.