पिंपरी – चिंचवडच्या खंडणी विरोधी पथकाने चार सराईत गुन्हेगारांना अटक केला असून त्यांच्याकडून पाच पिस्तूल आणि दहा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांवर हत्येचा प्रयत्न, आर्म अॅक्ट, दरोडा अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असून त्यांना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. अस्लम अहमद शेख, सचिन उत्तम महाजन, संतोष विनायक नातू, राहुल उर्फ खंडू गणपत ढवळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
हेही वाचा – पुणे : येरवडा कारागृहात गुंडाकडून पोलीस शिपायावर हल्ला
हेही वाचा – पिंपरी : कुदळवाडीत भंगाराच्या वादातून मित्राचा खून, मृतदेह जंगलात टाकला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगताप डेअरी चौकात एकजण संशयितरित्या थांबला असून त्याच्याकडे शस्त्र असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पथकाने सापळा रचून अस्लम शेख याला ताब्यात घेत त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त केले. त्यानंतर त्याच्या तीन साथीदारांना अटक करून आणखी चार पिस्तूल आणि दहा काडतुसे, असा एकूण दोन लाख ५५ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. पैकी सचिन, संतोष, राहुल हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर पुणे, पुणे ग्रामीण आणि सोलापूर येथे दरोडा, खून, खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी अपहरण, जबरी चोरी, जबर दुखापत करणे, बेकायदेशीरपणे पिस्तुल बाळगणे, असे गुन्हे दाखल आहेत.