पुणे : देशी बनावटीची पिस्तुलांची मध्य प्रदेशातून खरेदी करून विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या हाॅटेल कामगारासह साथीदाराला ग्रामीण पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पाच पिस्तूल, चार काडतुसे जप्त करण्यात आली.

अनिकेल विलास गव्हाणे (वय २०, गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर), मंगेश दादाभाऊ खुपटे (वय २०, रा. जवळा, ता. पारनेर, जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शिरुर बाह्यवळण मार्गावर दी नाना स्पाॅट हाॅटेलजवळ गव्हाणे आणि खुटे थांबले होते. त्यांच्याकडे देशी बनवाटीची पिस्तूल असून, पिस्तूल विक्री करण्याच्या तयारीत आरोपी असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. त्यांची झडती घेण्यात आली. त्यांच्याकडे पाच पिस्तूल आणि चार काडतुसे सापडली.

हेही वाचा >>>बारामतीत पिस्तुलाच्या धाकाने व्यापाऱ्याची लूट, ग्रामीण पोलिसांकडून तिघे गजाआड

आरोपी गव्हाणे याची पोलिसांनी चौकशी केली. हाॅटेलमध्ये काम करताना गव्हाणेची एका चादर विक्रेत्याशी ओळख झाली. मध्य प्रदेशातील सेंधवा येथून पिस्तुलांची खरेदी करुन ती जादा दरााने विक्री करुन पैसे कमाविता येतील, असे चादर विक्रेत्याने त्याला सांगितले. एक महिन्यांपूर्वी गव्हाणे पिस्तूल खरेदी केल्याची माहिती तपासाता मिळाली. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, सहायक निरीक्षक हनुमंत गिरी, नाथसाहेब जगतपा, विनोद मोरे, विजय शिंदे, परशुराम सांगळे, नीरज पिसाळ यांनी ही कारवाई केली.