पुणे : डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत जंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन महाविद्यालय (नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता) रस्त्यावरील पाच दुकाने गुरुवारी पहाटे पाच ते सहाच्या दरम्यान फोडण्यात आली. या पाच दुकानांत मिळून एकूण दीड लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक गिरिषा निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असता, दोन मुले दुकानांचे शटर उचकटून आतील गल्ल्यातून रोकड चोरत असल्याचे दिसून आले. त्यांनी केवळ रोकडच चोरण्यावर भर दिला. दुकानांतील अन्य वस्तू चोरल्या नाहीत. एका दुकानातून सर्वाधिक एक लाख २० हजार रुपये चोरीला गेले आहेत.

हेही वाचा – चंद्रपूर जिल्ह्यात भाजपचे ‘कुणबी कार्ड’, सहापैकी तीन उमेदवार कुणबी

दागिन्यांची चोरी

टेरेसवरील जिन्याने खाली उतरून घरात प्रवेश करून अज्ञाताने पावणेदोन लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला. खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोहियानगर येथे ही घटना घडली. या प्रकरणी लोहियानगर येथील इनामके मळ्याजवळ राहणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या परिसरातील घरे जवळ-जवळ असून एका घराच्या टेरेसवरून दुसऱ्या घराच्या टेरेसवर सहज जाता येते. या मार्गाचा अवलंब करून चोरटा आला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हेही वाचा – जरांगेची मतपेढी अपक्षांच्या पाठीशी ?

वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवनंदा हाऊस येथे घरफोडीची एक घटना घडली. या प्रकरणी ४९ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली असून, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार यांच्या बंद सदनिकेच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञाताने घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.