मोर्चावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर, सूचना देण्यासाठी ध्वनिवर्धक यंत्रणा
मराठा क्रांती मोर्चासाठी शहरात आज (२५ सप्टेंबर) शहरात पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मोर्चात मोठय़ा संख्येने नागरिक सहभागी होणार आहेत. त्यामुळे मोर्चात सहभागी झालेल्यांना सूचना देण्यासाठी मार्गावर ठिकठिकाणी ध्वनिवर्धक लावण्यात आले आहेत, तसेच पोलिसांकडून सूचना देण्यासाठी चाळीस रिक्षांचा वापर करण्यात येणार आहे. संपूर्ण मोर्चावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. २३ ठिकाणी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
मराठा मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था आणि वाहतुकीचे नियोजन यादृष्टीने बंदोबस्ताची आखणी केली आहे. पोलिसांनी शनिवारी (२४ सप्टेंबर)बंदोबस्ताची रंगीत तालीम घेतली. टिळक चौक ते विधान भवन या मार्गाची पाहणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली. मोर्चाला होणारी गर्दी विचारात घेऊन उद्या १६ पोलीस उपायुक्त, ११ सहायक आयुक्त, १०० पोलीस निरीक्षक, ३५० सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, पाच हजार पोलीस, बाँब शोधक पथक, राज्य राखीव पोलीस दलाच्या सहा तुकडय़ा, गृहरक्षक दलाचे ७०० जवान, शीघ्र कृती दलाच्या ७ तुकडय़ा असा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
डेक्कन भागातील संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मोर्चाचा प्रारंभ होणार आहे. मोर्चाचा प्रारंभ झाल्यानंतर गटागटाने सहभागी झालेल्यांना मार्गावर सोडण्यात येणार आहे. यासंदर्भात संयोजकांशी चर्चा क रण्यात आली आहे. त्यामुळे गर्दीचे नियंत्रण करणे शक्य होईल. गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी खास पथके तयार क रण्यात येणार आहेत. पोलिसांच्या सीसीटीव्ही कमांड सेंटरमधून संपूर्ण मोर्चावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. संपूर्ण मार्गावर ध्वनिवर्धक लावण्यात आले आहेत, तसेच चाळीस रिक्षांवर ध्वनिवर्धक लावण्यात आले आहेत. मोर्चात सहभागी झालेल्यांना सूचना देण्यासाठी ध्वनिवर्धक यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे.
बंदोबस्ताची रचना
- पाच हजार पोलीस तैनात
- सूचना देण्यासाठी ध्वनिवर्धक यंत्रणा
- उंच इमारतींवर पोलिसांची पथके तैनात
- शहरात २१ ठिकाणी मनोरे
- व्हिडीओ चित्रीकरण
- गटागटाने मोर्चा सोडणार, त्यामुळे गर्दीचे नियंत्रण
- टिळक चौकात तात्पुरता पोलीस नियंत्रण कक्ष
- राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकडय़ा
- २३ ठिकाणी रुग्णवाहिका
मराठा क्रांती मोर्चात मोठय़ा संख्येने पुणे शहर आणि जिल्ह्य़ातील नागरिक सहभागी होणार आहेत. त्यामुळे मध्यभागातील रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत. उद्या (२५ सप्टेंबर) रविवार असल्याने नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये. तातडीने वैद्यकीय सुविधा किंवा रुग्णवाहिकेची गरज लागल्यास नागरिकांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाशी (दूरध्वनी- १००) संपर्क साधावा,असे आवाहन पुणे पोलीस आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.मोर्चाची सांगता झाल्यानंतर दुपारी तीननंतर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल,अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.