लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : शेतातील कामे करण्यासाठी पाच कामगारांचे अपहरण करून कर्जत तालुक्यातील दुरगाव येथे शेतातील खोलीत दहा दिवस डांबून ठेवले आणि त्यांच्याकडून शेतातील कामे करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आळंदी पोलिसांनी पाचही कामगारांची सुटका केली असून तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १४ ते २५ मार्च या कालावधीत घडली.
याप्रकरणी मोहन मारुती वगरे (वय ३०, रा. आळंदी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वगरे, देवानंद सुभाष लांबटोंगळे (रा. यवतमाळ), पप्पू गणेशराव मगर (रा. हिंगोली), मुकुलकुमार डिसुझा (रा. उत्तर प्रदेश), श्रीराम बेंद्रे (रा. परभणी) हे कामाच्या शोधात आळंदी येथे आले होते. मागील काही महिन्यांपासून सर्वजण आळंदी येथे राहत होते. १४ मार्च रोजी आरोपी एका मोटारीतून आळंदीत आले. पाचही कामगार आळंदी येथील नगर परिषद चौकात कामाच्या शोधात थांबले होते.
आरोपींनी पाच जणांना टरबुजांची गाडी भरायची असल्याचे सांगून जबरदस्तीने मोटारीमध्ये बसवले. त्यानंतर पाचही कामगारांना अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दूरगाव येथे नेले. तिथे एका शेतातील खोलीत पाचही जणांना डांबून ठेवले. दिवसभर त्यांच्याकडून काम करून घेतले जात होते. कामाचा कोणताही मोबदला दिला जात नव्हता. रात्रीच्या वेळी डांबून ठेवले जात होते. दरम्यान आरोपींनी वगरे आणि मगर यांना मारहाण करत दमदाटी केली.
वगरे यांची पत्नी आजारी असल्याने तिच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी त्यांनी आरोपींकडे फोन मागून घेतला. वगरे यांनी पत्नीची विचारपूस केली असता पत्नी जास्त आजारी असल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी आरोपींकडे विनंती करून जाण्याची मागणी केली. वगरे हे पत्नीला पाहण्यासाठी आळंदी येथे आले असता त्यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार त्यांनी पोलिसांना सांगितला. पोलिसांनी तत्काळ कर्जत येथे धाव घेत सर्व कामगारांची शेतातून सुटका केली. आरोपींचा शोध सुरु आहे. पोलीस उपनिरीक्षक तुकाराम खडके तपास करीत आहेत.