खरेदी केलेल्या जमिनीची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी दीड हजारांची लाच घेणाऱ्या महिला तलाठ्यास विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी पाच वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. नोव्हेंबर २०१५ साली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने भोर तालुक्यातील सारोळा येथे ही कारवाई केली होती.
हेही वाचा- अपघातात सहा महिन्याचं बाळ आईच्या हातातून पडलं अन थेट ट्रॅक्टरखाली आलं…
सीमा सुभाष कांबळे (वय ३५, रा. शिरवळ, जि. सातारा)असे शिक्षा सुनवलेल्या महिला तलाठ्याचे नाव आहे. कांबळे सारोळा येथे तलाठी होत्या. खरेदी केलेल्या जमिनीची सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे दीड हजारांची लाच मागितली होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आल्यानंतर कांबळे यांच्यावर कारवाई केली होती. या खटल्यात सरकारी वकील ॲड. प्रेमकुमार अगरवाल यांनी सहा साक्षीदार तपासले. तक्रारदार आणि तलाठी कांबळे यांच्यात झालेले संभाषण ध्वनीमुद्रीत करण्यात आले आहे. आरोपी आणि तक्रारदाराच्या आवाजाची पडताळणी करण्यात आली. आरोपीकडून तक्रारदाराच्या कामाबाबतची कागदपत्रे जप्त करण्यात आली होती, असे ॲड. अगरवाल यांनी युक्तीवादात न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालायने साक्ष तसेच पुरावे ग्राह्य धरून भष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम कायदा कलम ७, १३ अन्वये पाच वर्षे सक्तमजुरी आणि एक लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास आणखी सहा महिने शिक्षेची तरतूद न्यायालायने निकालपत्रात केली आहे.
हेही वाचा- मॉल, दुकानांमध्ये वाइन विक्रीबाबत लवकरच धोरण; शुल्कमंत्री शंभुराज देसाई यांची माहिती
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अरूण घोडके यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायलायीन कामकाजासाठी पोलीस नाईक जगदीश कस्तुरे, पोलीस हवालदार अतुल फरांदे यांनी सहाय केले.