दसरा-दिवाळीचा ‘फेस्टिव्हल सिझन’ आणि आकर्षक ‘ऑफर’ यामुळे मुहूर्तावर घरांची खरेदी करण्याच्या किंवा घरांची नोंदणी (बुकिंग) करण्याच्या  प्रक्रियेने शहरात वेग घेतला आहे. वन बीएचके आणि टू-बीएचके या श्रेणीतील घरांना मध्यमवर्गीयांकडून चांगली पसंती मिळत असून घरांच्या नोंदणीमध्ये सध्याचा विचार करता तीस ते चाळीस टक्क्य़ांपर्यंत वाढ झाल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे २५ ते ३५ लाखांपर्यंतच्या घरांपासून ६० ते ७० लाखांपर्यंतच्या टु-बीएचके सदनिकांचे व्यवहार या कालावधीत होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवरात्रोत्सवाला झालेला प्रारंभ, सहा दिवसांवर येऊन ठेपलेला दसरा आणि त्यानंतरचा दिवाळीचा सण अशा उत्सवाच्या कालावधीत नवनवीन खरेदी करण्याकडे नागरिकांचा ओढा असतो. पितृ पंधरवडा झाला, की प्रामुख्याने वाहनखरेदी, कापडबाजाराबरोबरच घरांची खरेदी किंवा घरांचे बुकिंग करण्याच्या प्रक्रियेला वेग येतो. बांधकाम व्यावसायिकांसाठी जानेवारी ते मे हा कालावधी व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. या कालावधीत मोठय़ा प्रमाणावर घरांची खरेदी व मुहूर्तावर ताबा घेतला जातो. मात्र त्यापूर्वी दसरा-दिवाळीत घरांची नोंदणी करण्यात येते. यंदाही शहरात हेच चित्र असून उत्सवाच्या मुहूर्तावर घरांची नोंदणी करण्याला मोठा प्रतिसाद असल्याचे शहरातील बांधकाम व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. उत्सवाचे वातावरण, दिवाळीमुळे होणारा बोनस, उत्सवाच्या कालावधीत बांधकाम व्यावसायिकांकडून दिल्या जाणाऱ्या आकर्षक सवलती यामुळे घरांच्या खरेदीचे प्रमाण वाढल्याचेही सांगण्यात आले. घर खरेदी किंवा बुकिंग करताना जागा आणि पायाभूत सुविधांची उपलब्धता लक्षात घेतली जाते. त्यामुळे उपनगरामध्येही घर बुक करण्याकडे मध्यमवर्गाचा ओढा असतो. साधारणपणे २५ ते ३५ लाखांपर्यंतच्या वन बीएचके फ्लॅटची नोंदणी होत आहे. त्याचबरोबर कुटुंबातील वाढती संख्या लक्षात घेऊन टू-बीएचके फ्लॅट बुक करण्याकडेही ग्राहकांचा ओढा असतो, अशी माहिती मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र पवार यांनी दिली.

यासंदर्भात बोलताना परांजपे ग्रुपचे अमित परांजपे म्हणाले, की पितृ पंधरवडा संपला की घर बुक करण्याकडे ग्राहकांचा ओढा असतो. त्यामुळे या कालावधीत बुकिंग करण्याच्या प्रमाणात वाढ झालेली असते. साधारणपणे चाळीस टक्क्य़ांपर्यंत हे प्रमाण वाढलेले दिसते. मात्र बुकिंग करताना जागा कोणती आणि आर्थिक बाबीही ग्राहकांकडून लक्षात घेतल्या जातात. आयुष्यातील एक मोठी गुंतवणूक म्हणून घर खरेदीकडे मध्यमवर्गाकडून पाहिले जाते.

वाहनखरेदी, कापडबाजारात दसरा-दिवाळीमध्ये चांगली उलाढाल असते. स्वत:चे हक्काचे घर असावे, अशी मध्यमवर्गीयांची इच्छा असते. त्यामुळे या कालावधीत नोंदणीही वाढत जाते. प्रत्यक्षात फेब्रुवारीपासून मेपर्यंत बांधकाम व्यवसायात उलाढाल होते. यंदाही बांधकाम क्षेत्रातील मंदी हटत असल्यामुळे या प्रक्रियेला वेग आला आहे. त्यामुळे अगदी ६० ते ७० लाखांपर्यंतच्या टू-बीएचके घरांनाही वाढती मागणी आहे, अशी माहिती बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी दिली.

अविनाश कवठेकर, पुणे</strong>

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flat booking hike by 40 percent in pune