पुणे : विमान प्रवाशांचे हाल दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. पुणे विमानतळावर प्रवाशांना तब्बल आठ तास विमानाची प्रतीक्षा केल्यानंतर अचानक मध्यरात्री ते रद्द झाल्याचे कळविण्यात आले. यामुळे संतप्त प्रवाशांनी विमानतळ प्रशासनासह विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींना धारेवर धरले. काही प्रवाशांनी तर विमान कंपनीच्या विरोधात घोषणाबाजी केली. यामुळे विमानतळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
पुणे विमानतळावरून स्पाईसजेटचे पुणे ते दिल्ली हे विमान २१ जानेवारीला दुपारी ४.२० वाजता नियोजित होते. त्यानंतर हे विमान रात्री ७ वाजता उड्डाण करेल, असे कंपनीने जाहीर केले. प्रवासी विमानाचे उड्डाण कधी होणार याची वाट पाहात विमानतळात थांबले होते. त्यानंतर पुन्हा या विमानाला रात्री ९ वाजेपर्यंत विलंब होत असल्याची घोषणा झाली. काही काळानंतर या विमानाला आणखी विलंब होत असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यावेळी प्रवाशांमध्ये अस्वस्थता वाढू लागली. त्यांनी स्पाईसजेटच्या प्रतिनिधींकडे विचारणा करण्यास सुरूवात केली. मात्र, त्यांच्याकडे कोणतेही समाधानकारक उत्तर नव्हते.
आणखी वाचा-केंद्र सरकारची नियमावली अन्यायकारक, खासगी शिकवणीचालक आक्रमक
अखेर मध्यरात्रीच्या सुमारास स्पाईसजेटचे विमान रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे तब्बल आठ तास विमानतळावर ताटकळत थांबलेल्या प्रवाशांच्या संयमाचा बांध तुटला. त्यांनी स्पाईसजेटस आणि विमानतळ प्रशासनाला यावरून धारेवर धरले. काही प्रवाशांनी स्पाईसजेटच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केल्याने गोंधळ निर्माण झाला. अनेक प्रवाशांनी समाज माध्यमावर याबाबतचे आपले अनुभव मांडले आहेत. स्पाईसजेटवर कारवाई करावी, अशी मागणीही अनेक प्रवाशांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री जोतिरादित्य शिंदे यांच्याकडे समाज माध्यमांवरून केली आहे.
पुणे विमानतळावर आम्ही अडकलो आहोत. स्पाईसजेटने दिल्लीला जाणारे विमान खराब हवामानामुळे रद्द केले आहे. इतर विमान कंपन्यांची दिल्लीला जाणारी विमाने सुरळीत सुरू आहेत. स्पाईसजेटकडून आम्हाला इतर कोणतीही सुविधा मिळालेली नाही. कृपया केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री जोतिरादित्य शिंदे यांनी आम्हाला मदत करावी. -अनुज त्यागी, प्रवासी
आणखी वाचा-मनोज जरांगेंची पदयात्रा उद्या पुण्यात; कडक पोलीस बंदोबस्त, जाणून घ्या वाहतूक बदल
सुमारे १६० प्रवासी स्पाईसजेटच्या दिल्लीला जाणाऱ्या विमानासाठी आठ तास विमानतळावर ताटकळत थांबले होते. अचानक स्पाईसजेटने विमानच रद्द केले. आम्हाला कंपनीच्या प्रतिनिधींनी आठ तास मूर्ख बनविले. हवाई वाहतूक महासंचालनालयाने या प्रकरणी चौकशी करून प्रवाशांना न्याय मिळवून द्यावा. -प्रयेश बंधुवार, प्रवासी