पुणे : पुण्यातील संततधार पाऊस आणि खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने भारतीय सैन्य दलाची तुकडी एकतानगर येथे मदत कार्यात तैनात करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्हाधिकारी कार्यालयाने भारतीय लष्कराच्या सहाय्याची मागणी केल्यानंतर तातडीने लष्कराची तुकडी मदतकार्यात सहभागी झाली. पूरग्रस्त भागात तैनात केलेल्या या तुकडीत सुमारे १०० जवानांचा समावेश आहे. या तुकडीमध्ये मराठा लाईट इन्फंट्रीच्या पायदळातील जवान, बॉम्बे इंजिनिअर्स ग्रुपचे अभियंता कार्य दल आणि खडकीच्या लष्करी रुग्णालयातील वैद्यकीय पथकाचा समावेश आहे. ही तुकडी, बचाव नौका, मानवरहीत स्वयंचलित हेलिकॉप्टर्स (क्वाडकॉप्टर) आणि इतर आवश्यक बचावसाधनांनी सुसज्ज आहे. बचावतुकडीच्या प्रमुखांनी (कमांडर) परिस्थितीचा नागरी प्रशासनासोबत प्राथमिक आढावा घेतला. खडकवासला धरणातून पाण्याचा वाढीव विसर्ग सुरू केल्याने एकता नगरसह अनेक भागात पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.

आणखी वाचा-शास्त्रज्ञांनी शोधले ३४ नवीन अतिविशाल रेडिओ स्रोत, जीएमआरटीच्या सहाय्याने संशोधन

नागरी प्रशासनाच्या सहकार्याने, भारतीय लष्कराच्या या तुकडीने जलमय भागातील सर्व इमारती आणि घरे रिकामी करण्यास सुरुवात केली असून, रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले जात आहे.पूरग्रस्त भागाचा परिणामकारक आढावा घेऊन प्रभावी उपाययोजना करण्यासाठी क्वाडकॉप्टर आणि फुगवता येण्याजोग्या रबरी नौकांच्या सहाय्याने टेहळणी करण्यात येत आहे.

सुरु असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, द्वारका अपार्टमेंटमधून, काही अडकलेल्या लोकांची यशस्वीरित्या सुटका करण्यात आली. रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेल्या निवासी इमारतींमध्ये आपत्कालीन निर्गमन व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार मदत करण्यासाठी अतिरिक्त राखीव मदत तुकड्याही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flood again in pune contingent of 100 army personnel has been deployed pune print news ccp 14 mrj