पुणे : जुलैच्या शेवटच्या आठवड्यात आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पुणे शहरासह जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने पुणे व परिसरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. पूरामुळे मुठा नदीकाठी राहणाऱया अनेकांच्या गाड्यांचे नुकसान झाले आहे. गाड्यांचा इन्शुरन्स असल्यास संबंधितांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जुलैमधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, याबाबतचा अहवाल आठ कोटी २३ लाख ६७ हजार ५०० रुपयांच्या निधीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पुन्हा धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने मुठा नदीकाठच्या नागरी वस्तीत पाणी शिरले होते. पुणे शहरातील सिंहगड रस्ता, ढोले पाटील, येरवडा, नगररस्ता, शिवाजीनगर-घोलेरस्ता, वारजे-कर्वेनगर, कसबा-विश्रामबाग वाडा आणि औंध-बाणेर या क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरातील ५३७ कुटुंबांतील १९०६ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले होते.

हेही वाचा >>> पुढची निवडणूक आली, तरी मागच्या निवडणुकीतील मतदान यंत्रे गोदामातच सीलबंद! मावळ मतदारसंघातील स्थिती; हे आहे कारण…

पिंपरी-चिंचवडमधील ३०५ कुटुंबांतील १३६५ नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले होते. तसेच खेड तालुक्यात सागर घेर (वय ३५, रा. धामारी, खेड) या तरुणाचा पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे, असे जिल्हा प्रशासनाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या नुकसानीचे पंचनामे पुन्हा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याबाबत बोलताना जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे म्हणाले, की धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्याने मुठा नदीकाठच्या नागरी वस्तीत पाणी शिरले होते. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पहिल्या टप्प्यातील पंचनामे झाले आहेत. उर्वरित पंचनामे करण्यात येत आहेत. अनेक नागरिकांच्या विशेषत: पुणे शहरातील अनेक नागरिकांच्या वाहनांचे पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाल्याचे समोर येत आहे. मुख्यमंत्री पाहणीसाठी पुण्यात आले होते, तेव्हाही ही बाब बाधित नागरिकांनी निदर्शनास आणून दिली. या पार्श्वभूमीवर झालेल्या नुकसानीचे पंचनामे केल्यानंतर संबंधित नागरिकांना पंचनाम्याची कॉपी उपलब्ध करून दिली जाईल. ही कॉपी वाहनांच्या नुकसान भरपाईसाठी इन्शुरन्स कंपनीला पाठविण्यात येणाऱ्या क्लेमसोबत जोडता येईल. त्यामुळे संबंधितांना इन्शुरन्स मिळण्यास मदत होईल. असा निर्णय घेण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flood hit citizens of pune to get huge relief pune print news psg 17 zws