लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : फूल उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. या शेतकऱ्यांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचविणार असल्याची ग्वाही बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध गावांना खासदार सुळे भेट देत आहेत. कोपरा सभा, विकासकामांची उद्घाटन त्यांच्या हस्ते करून निवडणुकीची तयारी त्यांनी सुरू केली आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आणखी वाचा-पिंपरी-चिंचवडकरांना आता घराजवळच उपचार; ७९ आरोग्यवर्धिनी केंद्र
पुरंदर तालुक्यातील पोंढे येथे रस्त्याचे भूमिपूजन, गावातील विविध विकासकामांचे उद्घाटन खासदार सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. बाजारपेठेत प्लास्टिक फुलांच्या अतिवापरामुळे सामान्य फूल उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे खासदार सुळे यांनी प्लास्टिक फुलांच्या बंदीसाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले. संसदेत प्लास्टिकच्या फुलांच्या बंदीबाबत मुद्दा मांडणार आहे. बाजारपेठेत चीनमधून येणाऱ्या प्लास्टिक फुलांवर अधिक मूल्य आकारण्याची मागणी करणार आहे. तसेच संसदेत प्लास्टिक फुलावर बंदी आणण्याचा विषय मांडणार आहे. त्यामुळे काहीजण नाराज होतील. मात्र, फुलउत्पादक शेतकऱ्यांसाठी हा विषय संसदेत मांडणार आहे. तसेच प्लास्टिकच्या फुलांचे हार, गुच्छ स्वीकारणार नाही, असेही सुळे यांनी या वेळी जाहीर केले.