पुणे प्रतिनिधी  :मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने सुवासिक विविधरंगी फुलांनी सजलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि लाडक्या गणरायाचे रुप डोळ्यांमध्ये साठविण्यासाठी पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली. मोग-याच्या ५० लाख फुलांसह लिली, झेंडू, जास्वंद, गुलाब, चाफा यासारख्या फुलांनी गाभा-यासह सभामंडपात आकर्षक सजावट करण्यात आली. फुलांनी सजलेल्या गाभा-यातील गणरायाचे रुप अधिकच मनोहारी दिसत होते.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, दोन दिवसांपासून पुष्पसजावटीची तयारी तब्बल १४० महिला व ८० पुरुष कारागिर करीत होते. यंदाच्या पुष्पसजावटीमध्ये ३००० गुलाब बंडल, १५०० लिली बंडल, १४०० किलो झेंडू, १५०० किलो शेवंती, १००० किलो गुलछडी, २० हजार चाफा, १०० किलो गुलाब पाकळी तसेच कमळ, जाई-जुई, जास्वंद यांसह अनेक प्रकारची फुले वापरण्यात आली होती. मंंदिरात रंगीबेरंगी फुलांची सजावट प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये टिपत होता. गणरायाच्या चांदीच्या मूर्तीला  उटीचे लेपन करण्यात आले. तसेच मोगरा महोत्सवासह वासंतिक उटीचे भजन अखिल भारतीय वारकरी मंडळातर्फे करण्यात आले.