रानावनात भटकंती करण्याची हौस असलेल्यांना तिथल्या पानाफुलांविषयी कुतूहल तर वाटते; पण पाहिलेली वनस्पती कोणती आहे याविषयी अनेकदा काहीच माहिती मिळू शकत नाही. आता मात्र वनस्पतिप्रेमींची ही अडचण फक्त एका क्लिकवर दूर होणार आहे. वनस्पतींची माहिती देणारे ‘फ्लॉवर्स ऑफ सह्य़ाद्री’ हे वेब अप्लिकेशन लवकरच उपलब्ध होत असून त्याद्वारे सह्य़ाद्रीतील तब्बल बावीसशे सपुष्प वनस्पतींचा शोध घेता येणार आहे.
वनस्पती अभ्यासक श्रीकांत
इंगळहळ्ळीकर म्हणाले, ‘‘सह्य़ाद्रीतील बहुतेक सर्व वनस्पतींचा पुस्तकाच्या तीन भागांमध्ये अंतर्भाव आहे. याच सर्व वनस्पतींची माहिती अॅपमध्येही देण्यात आली असून त्यात ‘सर्च’ आणि ‘आयडेंटिफाय’ असे दोन पर्याय मिळणार आहेत. वनस्पतीच्या नावावरून किंवा छायाचित्रावरून त्या वनस्पतीसंबंधीची संपूर्ण माहिती मिळू शकेलच; पण वनस्पतीचे नाव माहिती नसेल, तरीही पानाफुलांच्या वर्णनावरून त्याबाबतची माहिती शोधता येईल. वनस्पती कुठे दिसली, तिच्या पानाचा आकार कसा आहे, फुलांचा रंग आणि आकार कसा आहे, फुलांना वास आहे का, असेल तर तो चांगला आहे की वाईट आहे अशी माहिती भरून उपलब्ध वनस्पतींमधून नेमकी ती वनस्पती शोधली जाईल. वनस्पतीच्या वर्णनावरून तिचे नाव आणि माहिती शोधण्याकरिता वीस पर्याय देण्यात आलेले आहेत. मात्र यातील केवळ ४ ते ५ पर्यायांची माहिती भरून देखील वनस्पती चटकन सापडते.’’
या अॅपसाठी ‘गुगल’ आणि ‘अॅपल’ या कंपन्यांशी करार करण्यात आला असून ते लवकरच अॅपस्टोअरवर उपलब्ध होणार आहे. नाममात्र शुल्क भरून ते डाऊनलोड करता येईल. २१ मार्चला असलेल्या वनदिनाच्या निमित्ताने १९ मार्च ते २१ मार्च या कालावधीत बालगंधर्व कलादालन येथे ‘सह्य़ाद्री फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात २० तारखेला डॉ. दीपक शिकारपूर यांच्या हस्ते अॅपचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा