पिंपरी : शहरातील चिंचवड आणि भाेसरी विधानसभा मतदारसंघात मतदारांनी उत्स्फूर्तपणे रांगा लावून मतदानाचा हक्क बजाविला, तर पिंपरी विधानसभा मतदारसंघात मतदारांचा निरुत्साह दिसून आला. मतदारांना केंद्रापर्यंत आणण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू हाेती. मतदारयादीत चुकीची नावे असल्याच्या तक्रारी, मतदान केंद्रामध्ये माेबाइल घेऊन जाण्यावरून वादावादी, सहायता कक्षाकडून असहकार, मतदान स्थलांतर, नाव वगळणे, पैसेवाटपाचा आराेप अशा वातावरणात शहरातील तिन्ही मतदारसंघांतील मतदान बुधवारी पार पडले.
पिंपरी, भाेसरी आणि मावळमध्ये दुरंगी, तर चिंचवडमध्ये तिरंगी लढत हाेत आहे. पिंपरीत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे अण्णा बनसाेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या सुलक्षणा शिलंवत-धर यांच्यासह १५ उमेदवार, चिंचवडमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे राहुल कलाटे, भाजपचे शंकर जगताप आणि अपक्ष भाऊसाहेब भाेईर यांच्यासह २१, भाेसरीत भाजपचे महेश लांडगे, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे अजित गव्हाणे यांच्यासह ११, तर मावळमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे सुनील शेळके आणि अपक्ष बापू भेगडे यांच्यासह सहा उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.
हेही वाचा >>>भोसरीत समाविष्ट गावातील कौल निर्णायक?
सकाळच्या सत्रात उत्स्फूर्तपणे मतदान झाले. काही मतदान केंद्रांवर सकाळी सातपासूनच रांग लागल्याचे चित्र दिसून आले. नवमतदार, ज्येष्ठ उत्स्फूर्तपणे मतदान करताना दिसले. उच्चभ्रू भागातील मतदार स्वतःहून बाहेर पडले, तर झोपडपट्टी भागातील मतदारांना केंद्रावर घेऊन जाण्यासाठी माजी नगरसेवक, पक्षाच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू हाेती. अनेकांनी रिक्षाची साेय केली हाेती. राजकीय पक्षांनी बूथ उभारले हाेते. बूथवर मतदार पावती देण्यात येत हाेती. ज्येष्ठ नागरिक, वृद्धांसाठी व्हीलचेअर, पाण्याची व्यवस्था, वाहनतळ, मंडप उभारले हाेते. मतदान केंद्राबाहेर उभारलेल्या सेल्फी पॉइंटवर सेल्फी काढण्यासाठी मतदारांनी गर्दी केली हाेती. महापालिकेने उभारलेल्या हरित मतदान केंद्रांवरील वनस्पतींचे प्रदर्शन मतदार उत्सुकतेने पाहत होते. दुपारच्या सत्रात मतदानाचा वेग काहीसा मंदावला.
हेही वाचा >>>मावळमध्ये मतदानाचा उच्चांक कोणाला मारक?
ऊन उतरल्यानंतर पुन्हा मतदारांच्या रांगा लागल्या हाेत्या. अनेकांची नावे मतदारयादीत सापडली नाहीत. त्यांना मतदानाविना परतावे लागले. नाव वेगळे आणि छायाचित्र दुसरेच असल्याने काही जण मतदान करू शकले नाहीत. घराजवळ असलेल्या मतदान केंद्रावर काही जण जात हाेते. मात्र, प्रत्यक्षात त्यांचे मतदान घरापासून लांब असलेल्या केंद्रावर आल्याने त्यांना मनस्ताप झाला. तसेच, चिंचवडमध्ये मतदारांना पैसेवाटपाचा आराेपही झाला. भाेसरी मतदारसंघातील घरकुलमधील साडेसात हजार मते पुण्यातील काेंढवा, हडपसर मतदारसंघात स्थलांतरित झाल्याचा आराेप येथील मतदारांनी केला. मतदानासाठी झालेली गर्दी आणि वाहनांमुळे काही चाैकांमध्ये वाहतूककाेंडी झाली हाेती.
भगव्या अन् पांढऱ्या टोप्यांनी वेधले लक्ष
भाेसरीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’ असा उल्लेख असलेल्या भगव्या टाेप्या परिधान केल्या हाेत्या. गळ्यात भगवे मफलर हाेते. तर, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ‘राम कृष्ण हरी’ असा मजकूर लिहिलेल्या पांढऱ्या टाेप्या परिधान केल्या हाेत्या. अनेक मतदान केंद्रांच्या बाहेर वारकरी वेशभूषेतील कार्यकर्ते मतदारांचे लक्ष वेधून घेत हाेते.
माेबाइलमुळे वादावादी
लाेकसभा निवडणुकीपासून मतदारांना मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात माेबाइल घेऊन जाण्यास निवडणूक आयाेगाने बंदी घातली आहे. मात्र, अनेक मतदार मतदानासाठी येताना माेबाइल घेऊन आले हाेते. त्यांना केंद्राबाहेर अडविले जात हाेते. त्यामुळे अनेक केंद्रांवर वादावादीचे प्रकार झाले. आयाेगाच्या मतदान सहायता कक्षाकडूनही मदत हाेत नसल्याचे दिसून आले.