भक्ती बिसुरे
दहा जिल्ह्य़ांतील वास्तव; दंत आणि अस्थिविकाराच्या रुग्णांत वाढ
दहा जिल्ह्य़ांमधील पिण्याच्या पाण्यात ‘फ्लोराईड’ असल्याने तेथील नागरिकांमध्ये दंत आणि अस्थिविकारांचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. चंद्रपूर, नांदेड, बुलढाणा, बीड, नागपूर, गडचिरोली, परभणी, जळगाव, वर्धा आणि नाशिक या जिल्ह्य़ांतील वाडय़ा-वस्त्यांवरील नागरिकांना ‘फ्लोराईड’युक्त पाणी प्यावे लागत आहे.
दहा जिल्ह्य़ांमधील वाडय़ा-वस्त्यांवर आजही पिण्यासाठी ‘फ्लोराईड’मुक्त शुद्ध पाणी मिळणे दुरापास्त आहे. ‘फ्लोराईड’युक्त पाणी प्यायल्याने दंतरोग आणि अस्थिरोगांच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी नुकताच २०१९चा राष्ट्रीय आरोग्य अहवाल (नॅशनल हेल्थ प्रोफाइल २०१९) प्रसिद्ध केला. या अहवालात सर्व राज्यांच्या आरोग्य स्थितीवर प्रकाश पडला आहे.
चंद्रपूर जिल्ह्य़ात २४, नांदेडमध्ये सात, बुलढाण्यात तीन, बीड, परभणी आणि वर्ध्यामध्ये प्रत्येकी चार, नागपूर जिल्ह्य़ात १२, गडचिरोली जिल्ह्य़ात पाच तर जळगाव आणि नाशिक जिल्ह्य़ात प्रत्येकी एका वाडी किंवा वस्तीवर अद्याप ‘फ्लोराईड’मुक्त पाणी पोहोचलेले नाही, असे राष्ट्रीय आरोग्य अहवालात नमूद केले आहे. विशेष म्हणजे नांदेड, चंद्रपूर, लातूर, वाशीम, यवतमाळ, बीड आणि नागपूर हे जिल्हे राष्ट्रीय फ्लोरॉसिस नियंत्रण आणि प्रतिबंध कार्यक्रमात सहभागी आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अहवालातील माहितीनुसार २०१८ मध्ये राज्यात ८४ हजार २१८ रुग्णांची तपासणी ‘फ्लोरॉसिस’साठी करण्यात आली. त्यांपैकी सुमारे पाच हजार ५१२ व्यक्तींना फ्लोरोसिस हा दंतविकार, तर १३३४ रुग्णांना ‘स्केलेटल’ हा अस्थिविकार झाल्याचा संशय आहे.
केवळ तीन राज्यांत शुद्ध पाणी : पाण्यातील ‘फ्लोराईड’ आणि आर्सेनिकच्या अंशाबाबत पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयानेही माहिती प्रसिद्ध केली आहे. देशभरात अशा वाडय़ावस्त्यांची संख्या सुमारे १० हजार ३७९ एवढी असून केवळ गुजरात, तमिळनाडू आणि तेलंगण ही तीन राज्ये फ्लोराईड युक्त पाण्यापासून संपूर्ण मुक्त असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.
मराठवाडय़ातील अनेक भागांमध्ये पाण्यातील फ्लोराईडमुळे दंतविकार आढळतात. पक्के दात येतात तेव्हा त्यावर पिवळे- तपकिरी ठिपके दिसल्यास तो फ्लोरॉसिस आहे असे समजावे. फ्लोरॉसिसमुळे दातांचे झालेले नुकसान दुरुस्त करण्यासाठी अनेक उपचार आहेत, मात्र तो पूर्ण बरा होत नाही. बाजारातील फ्लोराईडचा अंश असलेल्या टूथपेस्ट विकत घेऊ नका. या दुष्परिणामांपासून दूर राहाण्यासाठी फ्लोराईड नसलेले पाणी पिणे हा उत्तम पर्याय आहे.
– डॉ. तन्वी काळे, दंतवैद्यक
फ्लोराईडयुक्त पाणी प्यायल्याने हाडांचे विकार (स्केलेटल) होतात. या व्यक्तींची हाडे क्ष-किरण तपासणीत मजबूत दिसतात, प्रत्यक्षात ती खडूसारखी ठिसूळ असतात. त्यामुळे वारंवार फ्रॅक्चर होतात. परिणामी स्नायूंना इजा होते आणि हाडांची रचनाही बदलते. या आजारावर कायमस्वरूपी उपचार नाही.
– डॉ. नितीन भगली, अस्थिरोग तज्ज्ञ