पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कर्वे रस्त्यावरील नळ स्टाॅप या परिसरानंतर आता कोथरूड येथील वनाज ते चांदणी चौक ही प्रस्तावित मार्गिका दुमजली उड्डाणपुलावरून निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनने (महामेट्रो) पौड रस्त्यावरील कोथरूड डेपोपासून लोहिया आयटी पार्कपर्यंत ७०० मीटर लांबीच्या दुमजली उड्डाणपुलासाठी अंदाजे ८५ कोटी रुपयांचा आराखडा तयार करून पुणे महानगरपालिकेकडे मंजुरीसाठी पाठविला आहे.
पुणे शहराचे पश्चिम द्वार म्हणून पौड रस्ता ओळखला जातो. या मार्गावरून पुणे-मुंबई महामार्गावर सहज जाता येत असल्याने या रस्त्यावर कायम वाहनांची वर्दळ असते. दरम्यान, आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती असून या रस्त्यावर रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेकडून या रस्त्यावर उड्डाणपुलाचा प्रस्ताव मंजूर केला आहे.
त्यातच मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील मार्गिकांच्या विस्तारीकरणाला सुरुवात होत असून, वनाज ते चांदणी चौंक या मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. त्यामुळे नळ स्टाॅप येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या धर्तीवर पौड रस्त्यावरील कोथरूड डेपोपासून लोहिया आयटी पार्कपर्यंत ७०० मीटर अंतरापर्यंतचा दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी अंदाजे ८५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून तसा आराखडा तयार कऱण्यात आला आहे. हा आराखडा मंंजुरीसाठी पुणे महानगरपालिकेला पाठविण्यात आला असल्याची माहिती महामेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
वनाझ ते लोहिया आयटी पार्क या दुमजली उड्डाणपुलाचा विस्तृत आराखडा तयार करण्यात आला आहे. संबंधित आराखडा महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. सध्याच्या रस्त्यालगत उड्डाणपूल बांधला जाणार असल्याने अतिरिक्त जागेची आवश्यकता नाही.
– अतुल गाडगीळ, संचालक, महामेट्रो, पुणे.
कोथरूड परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दुमजली उड्डाणपुलाचा उपयोग होणार आहे. मेट्रोने पाठविलेल्या उड्डाणपुलाच्या आराखड्याचा महापालिका अभ्यास करून अपेक्षित बदल करण्याबाबत सूचना देण्यात येईल. – युवराज देशमुख, मुख्य अभियंता, प्रकल्प विभाग, पुणे महानगरपालिका
पुण्यातील दुमजली उड्डाणपूल
नळ स्टाॅप – लाॅ काॅलेज रस्ता ते म्हात्रे पूल आणि – ५५० मीटर
गणेशखिंड रस्ता – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक ते ई स्क्वेअर स्थानक – १.७ किलोमीटर कोथरूड – कोथरूड डेपो ते लोहिया आयटी पार्क – ७०० मीटर