ललित पाटील प्रकरणापासून ससून रुग्णालयातील गैरकारभार सातत्याने समोर येत आहे. आता पुणे अपघात प्रकरणातही अल्पवयीन चालकाच्या रक्ताची चाचणी करताना ससून रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी फेरफार केल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी सातत्याने ससूनच्या व्यवस्थापनावर आरोप केले जात आहेत. यावरून सुप्रिया सुळे यांनी शासनाकडे महत्त्वाची विनंती केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“पुणे जिल्हा आणि परिसरातील गोरगरीब रुग्णांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात ससून रुग्णालयाने सिंहाचा वाटा उचलला आहे. परंतु गेली काही दिवसांपासून या रुग्णालयाबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या की, “काही दिवसांपूर्वी ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरणी हे रुग्णालय चर्चेच्या केंद्रस्थानी होते. तर आता कल्याणीनगर ‘हिट ॲन्ड रन’ प्रकरणी आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याचे प्रकरण चर्चेत आहे. याप्रकरणी दोन वरीष्ठ डॉक्टरांना अटक देखील करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणामुळे ससूनची प्रतिमा काही प्रमाणात डागाळली. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज असून दोषी व्यक्तींना कठोर शासन व्हायला हवे.”

हेही वाचा >> Pune Accident : रक्ताच्या नमुन्यात फेरफार करण्यासाठी लाखो रुपयांची लाच? ससूनच्या कर्मचाऱ्याकडून रोख रक्कम जप्त

“वास्तविक पाहता ससून रुग्णालय हे उत्कृष्ट रुग्णसेवेसाठी ओळखले जाते. करोना काळात देखील येथे उत्तम सेवा उपलब्ध झाली होती. ससूनमध्ये तज्ज्ञ, अभ्यासू आणि अनुभवी डॉक्टर्स आहेत. त्यांच्या माध्यमातून उत्तम दर्जाचे उपचार गरजू व गरीब रुग्णांना मिळतात. याखेरीज परिचारिका व सपोर्टींग स्टाफचे देखील सहकार्य लाभते. शिवाय अनेक नामांकित डॉक्टर येथून शिकून गेले आहेत. परंतु गेल्या काही दिवसांच्या घटनाक्रमानंतर आणि डॉक्टरांच्या अटकेनंतर त्यांच्यावर देखील शंका घेतली जात आहे”, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.

गेल्या पाच वर्षांच्या कामकाजाची श्वेतपत्रिका काढा

“काही लोकांनी गैरकृत्य केले असेल तर त्यामुळे इतरांकडेही संशयाने पाहिले जाणे योग्य नाही. तसेच रुग्णसेवेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असणारी शासकीय संस्था अशाप्रकारे संशयाच्या भोवऱ्यात अडकणे हे चांगले लक्षण नाही. म्हणूनच रुग्णालय प्रशासनाच्या एकंदर कामकाजाची समिक्षा होणे आवश्यक आहे. माझी शासनाकडे मागणी आहे की, आपण ससूनच्या गेल्या पाच वर्षांच्या कामकाजाबाबत श्वेतपत्रिका काढून ससूनभोवती दाटलेले संशयाचे धुके काढून टाकण्यासाठी उपाययोजना करावी”, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी सरकारकडे केली आहे.

अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या चाचणीत फेरफार

अगरवाल याच्या मुलाच्या रक्ताच्या नमुन्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताचा नमुना ससून रुग्णालयातील डॉ. तावरे आणि डॉ. हाळनोर यांनी घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पुरावा नष्ट केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fog of suspicion surrounding sassoon hospital supriya sules demand to the government sgk