पिंपरी-चिंचवडकरांची शुक्रवारची (२७ मार्च) सकाळ उजाडली, ती दाट धुक्याच्या दुलईत! हे सर्वासाठीच आश्चर्य. कारण सध्या ना थंडीचे दिवस, ना पावसाळी वातावरण. तरीसुद्धा इतके धुके कसे? या प्रश्नाने नागरिक अचंबित झाले.. अखेर त्याचा संबंध लागला महाबळेश्वरमध्ये पडलेल्या पावसाशी. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाबळेश्वरमध्ये गुरूवारी रात्री वादळी पाऊस पडला, ते बाष्प जमिनीलगतच राहिले आणि ते काही कारणामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये अवतरले!
पिंपरी-चिंचवडच्या सर्वच भागात शुक्रवारी सकाळी दाट धुके पसरले होते. ते सकाळी साडेआठ-पावणेनऊपर्यंत कायम होते. सध्या उकाडय़ाचे दिवस आहेत, परिसरात पाऊसही झालेला नाही. तरीही हे धुके कसे, असा प्रश्न ते पाहणाऱ्याच्या चेहऱ्यावर होता. त्याचे प्रमाण इतके जास्त होते की सकाळच्या वेळी वाहनांचे दिवे लाऊनही पुढील काही अंतरावरच्या गोष्टी दिसत नव्हत्या. नदीच्या काठी, रस्त्यावर, वसाहतींमध्ये असे सर्वत्रच दाट धुके पाहायला मिळाले. असे असूनही हवेत गारवा नव्हता. उलट उकडतच होते.
अचानक धुके कशामुळे?
‘‘गुरूवारी दुपारनंतर महाबळेश्वर येथे वादळी पाऊस झाला. त्याचे बाष्प काही कारणामुळे वातावरणाच्या खालच्या थरात म्हणजे अगदी जमिनीलगतच राहिले. ते महाबळेश्वरच्या उंचीवरून खाली उतरून आसपासच्या परिसरात पसरले. त्याचा परिणाम म्हणून पुणे परिसरातही गुरूवारी रात्री भरपूर दमटपणा जाणवत होता. हे बाष्प पिंपरी-चिंचवडच्या भूरचनेमुळे तेथे जमा झाले. त्यातच तेथील धूर व प्रदूषित घटकाचीसुद्धा भर पडली असावी. त्यामुळे हे धुके दाटले. विशेष म्हणजे हे धुके असूनही वातावरणात उकाडा कायम होता’’
– डॉ. सुनीता देवी (पुणे वेधशाळेच्या संचालक)
महाबळेश्वरच्या वादळी पावसामुळे पिंपरी-चिंचवडला धुक्याची दुलई!
पिंपरी-चिंचवडकरांची शुक्रवारची (२७ मार्च) सकाळ उजाडली, ती दाट धुक्याच्या दुलईत! हे सर्वासाठीच आश्चर्य. कारण सध्या ना थंडीचे दिवस, ना पावसाळी वातावरण.
First published on: 28-03-2015 at 03:25 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fog pimpri chinchwad climate