राज्यातील प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका हॉटेल व्यावसायिकांना बसला आहे. खाद्यपदार्थ पार्सल घरी नेणाऱ्या ग्राहकांना या निर्णयाचा त्रास होत असून त्यावर तोडगा म्हणून आतून लॅमिनेटेड असलेल्या फॉईल पिशव्या आणि कंटेनरचा वापर करून अन्नपदार्थ पार्सल देण्यास सुरुवात झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्य शासनाने गुढीपाडव्यापासून (१८ मार्च) प्लॅस्टिक बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात शासकीय अधिसूचना पुरेशी सुस्पष्ट नाही. त्यामुळे सरसकट प्लॅस्टिकबंदी लागू झाली आहे का याबाबत संभ्रमावस्था आहे. मात्र, प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका हॉटेल व्यवसायाला बसला आहे. त्यातही अन्नपदार्थ पार्सल घेऊन जाणाऱ्या ग्राहकांची पंचाईत झाली आहे, अशी माहिती  पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशनचे सचिव किशोर सरपोतदार यांनी दिली.

सरपोतदार म्हणाले, गुढीपाडव्यापूर्वी प्लॅस्टिक डब्यामध्ये (कंटेनर) भाजी, आमटी, भात, पोळी असे पदार्थ पार्सल दिले जात होते. मात्र, आता प्लॅस्टिक बंदीचा निर्णय झाल्यामुळे या कंटेनरच्या वापरावर निर्बंध आले आहेत. आता बाजारामध्ये प्लॅस्टिक पिशव्या आणि कंटेनरची विक्री बंद झाली आहे. अनेक हॉटेल व्यावसायिकांनी स्वत:च्या हॉटेलचे नाव छापून घेतलेल्या प्लॅस्टिक कंटेनरचे काय करायचे हा प्रश्न आहे. अनेकांनी त्यामध्ये मोठय़ा रकमेची गुंतवणूक केली आहे. अन्नपदार्थ पार्सल नेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांमध्ये संभ्रम असल्यामुळे काहीजण घरातून डबे घेऊन येत आहेत. सध्या आम्ही हॉटेल व्यावसायिकांनी फॉईल पिशव्या आणि कंटेनरचा वापर सुरू केला आहे. आतून लॅमिनेटेड असलेली आणि वरून चंदेरी रंगाची दिसणाऱ्या फाईल पिशव्यांमध्ये अन्नपदार्थ चांगले आणि गरमदेखील राहतात. ‘आऊटडोअर केटिरग’मध्ये पिण्याच्या पाण्यासाठी स्टीलच्या ग्लासचा आणि कागदी कपांचा वापर करणे सुरू केले आहे. आईस्क्रीमसाठी फाईलचे कप वापरले जात आहेत. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्लॅस्टिक बंदीचा निर्णय चांगला असला तरी अन्नपदार्थ पार्सल घेऊन जाणाऱ्या ग्राहकांची पंचाईत झाली हे वास्तव नाकारता येत नाही.

अनामत रकमेवर स्टीलच्या डब्यांतून अन्नपदार्थ

प्लॅस्टिक बंदीचा निर्णय झाल्यामुळे जेवण पार्सल नेण्यासाठी ग्राहकांना डिपॉझिट तत्त्वावर स्टेनलेस स्टीलचे डबे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. डबे परत करा आणि डिपॉझिट घेऊन जा, असे आवाहन ग्राहकांना करण्यात आले आहे, असे ‘पूना बोर्डिग हाऊस’चे सुहास उडपीकर यांनी सांगितले. प्लॅस्टिक बंदीबाबत नागरिकांमध्ये जागरुकता आली असून अनेक ग्राहकांनी पार्सलसाठी घरातून डबे आणण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ज्यांना काही कारणांमुळे डबे आणणे शक्य होणार नाही त्यांच्यासाठी डिपॉझिट तत्त्वावर स्टेनलेस स्टीलचे डबे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या डब्यांतूनच अन्नपदार्थ पार्सल दिले जातात, असेही त्यांनी सांगितले. सध्या हॉटेल व्यावसायिक ज्या प्लॅस्टिक डब्यांतून अन्नपदार्थ देतात त्या डब्याची जाडी ५० मायक्रॉनपेक्षा जास्त असून हे डबे पुनर्वापर करण्यायोग्य आहेत, याकडेही उडपीकर यांनी लक्ष वेधले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Foil bags used for parcel food from restaurant operators in pune