पुणे : ‘आज कलावंताला कलेपेक्षा पुरस्कारांचे महत्त्व अधिक वाटते आहे. मात्र, लोककलावंताने पुरस्कारांच्या मागे न धावता कलेवर लक्ष द्यायला हवे. कलावंताने कला जोपासली तर पुरस्कार आपोआप मिळतात,’ असे मत कर्नाटक जानपत अकादमीच्या प्रमुख मंजम्मा जोगथी यांनी मंगळवारी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात आयोजित कार्यक्रमात लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे लिखित लोकरंगनायिका या पुस्तकाचे प्रकाशन जोगथी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी द्रविडीयन विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. एम. एन. व्यंकटेश आणि ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रवीण भोळे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी जोगथी बोलत होत्या.
कार्यक्रमाला ज्येष्ठ लेखिका अरुणा ढेरे, कालनिर्णयकार जयराज साळगावकर, भंडारा डोंगर ट्रस्टचे प्रमुख हभप बाळासाहेब काशीद, विभिषण चवरे, निवृत्त न्यायाधीश हभप मदनमहाराज गोसावी, राज्य कला संस्कृती मंचच्या अध्यक्ष सुखदा खांडगे, सचिव शैला खांडगे, शाहीर हेमंतराजे मावळे, लावणी कलावंत राजश्री नगरकर, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, प्रकाशक भारती आणि अभिषेक जाखडे उपस्थित होते.
तृतीयपंथी कलावंत म्हणून आलेल्या अडचणी, मिळालेले नकार आणि आत्महत्येच्या विचारांपासून परावृत्त होत पद्मश्रीपर्यंत केलेला पुरस्कार सांगताना जोगथी म्हणाल्या, ‘कलाकाराने नेहमी कलेचा ध्यास धरायला हवा. आलेल्या अडचणी पचवून केवळ काम करत राहायला हवे. सतत प्रयत्न करत राहायला हवे.’ डॉ. ढेरे म्हणाल्या, ‘बुद्धिजीवी परंपरा पुढे गेली. त्यात केवळ अभिजनांना प्रतिष्ठा मिळत गेली. मात्र, या सगळ्याचे मूळ असलेली लोककला ज्यांनी जपली त्यांना श्रेय द्यायचे आपण विसरून गेलो आहोत.’