पिंपरी : गणेश मंडळांनी ध्वनिवर्धक यंत्रणा लावताना विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक किंवा इतरांचा विचार करावा. आवाजाने कोणालाही त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी. ध्वनिप्रदूषण करु नये. गणेशोत्सवामध्ये आवाजाची मर्यादा पाळावी, अशा सूचना पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गणेश मंडळांना केल्या. मंडळांना परवानगीसाठी ‘एक खिडकी योजना’ सुरु केली असून यंदापासून गणेश मंडळांना ‘मोरया पुरस्कार’ देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध सुविधांचे नियोजन करण्याच्या दृष्टीने आणि शहरातील विविध गणेशोत्सव मंडळे तसेच पोलीस प्रशासन, वीज वितरण तसेच महापालिका अधिकारी यांची संयुक्त बैठक आकुर्डीतील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात झाली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा… दहा वर्षांच्या अविरत सेवेनंतर ‘राधा’ श्वानाचा मृत्यू
गणेश मंडळांना लागणारा परवाना विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये एक खिडकी योजनेच्या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. ही सुविधा सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहे. गणेश मंडळांना परवानगी देताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महापालिकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. मात्र, पोलीस प्रशासन, महापालिका तसेच इतर यंत्रणांनी निश्चित केलेल्या अटी शर्तींचे पालन करणे संबंधित मंडळांना बंधनकारक असणार आहे. शहरातील सर्व गणेश मंडळांनी स्वयंसेवकांची नेमणूक करून त्यांची यादी पोलीस प्रशासनास जमा करावी. पोलीस प्रशासनाकडून त्यांना तात्पुरत्या स्वरूपात ओळखपत्र देण्यात येईल. या स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजनही करण्यात येईल, असेही चौबे यांनी सांगितले.
हेही वाचा… पुणे: कस्टमने जप्त केलेला माल स्वस्तात देण्याचे आमिष; पुण्यातील व्यापाऱ्याची ६६ कोटींची फसवणूक
मंडळांसाठी घरगुती दराने वीज पुरवठा
गणेश मंडळांना वापरण्यासाठी विजेची सोय करण्यात येणार आहे. घरगुती दरानेच त्यांना वीज पुरविण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता अतुल देवकर यांनी सांगितले.
गणेश मंडळांना महापालिका सर्व सहकार्य करत आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. झाडांवर खिळे ठोकणे, पोस्टर लावणे, फांद्या तोडू नये. – प्रदीप जांभळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका