संजय जाधव
पुणे विमानतळावर प्रवाशांना महागड्या दराने खाद्यवस्तूंची विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. सँडविचसाठी ३५० रुपये आणि यंत्रातील चहासाठी १५० रुपये प्रवाशांना मोजावे लागत आहेत. त्यातही सँडविचसह इतर खाद्यपदार्थ हे ताजे बनवून दिले जात नाहीत, तर ते आधीच बनवून ठेवलेले असतात. त्यामुळे त्यांच्या दर्जाबाबतही प्रवासी तक्रार करीत आहेत. दरम्यान, विमानतळ प्रशासनाने खाद्यपदार्थांचे दर बाजारभावानुसार असून, विक्रेत्याने जादा दर लावल्याचे समोर आल्यास कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे.
हेही वाचा >>> पुणे: ससूनचा अजब कारभार!आयुर्वेदिक डॉक्टर बनला ससूनच्या अधिष्ठात्यांचा ‘पीए’
पुणे विमानतळावर प्रवाशांना जादा दराने पाण्याच्या बाटलीसह इतर खाद्यपदार्थांची विक्री केली जात असल्याच्या वारंवार तक्रारी येतात. आता एका प्रवाशाला सँडविचसाठी ३५० रुपये आणि चहासाठी १५० रुपये मोजावे लागले आहेत. या प्रवाशाने समाजमाध्यमावर आपला अनुभव मांडला आहे. असित रंजन असे या प्रवाशाचे नाव आहे. त्यांनी म्हटले आहे की, पुणे विमानतळावर शिळ्या सँडविचसाठी ३५० रुपये आणि यंत्रातील चहासाठी १५० रुपये मोजावे लागले. याबद्दल विक्रेत्याला जाब विचारला असता त्याने विमानतळ प्रशासनाला महिन्याला दहा लाख रुपयांचे भाडे द्यावे लागत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. विमानतळावरील खाद्यपदार्थांच्या किमतीवर कोणाचेच नियंत्रण नाही.
हेही वाचा >>> पुणे: दारूच्या नशेत मित्रांना आई, बहिणीवरून दिल्या अश्लील शिव्या; मित्रांनी केली हत्या
रंजन यांनी समाजमाध्यमावर अनुभव मांडल्यानंतर अनेक जणांनी अशाच प्रकारचा अनुभव आल्याचे सांगितले. विमानतळावरील विक्रेत्यांकडील खाद्यपदार्थ ताजे नसतात, ते आधीपासून बनवून ठेवलेले असतात, अशी तक्रार अनेक प्रवाशांनी केली. चित्रपटगृहांमधील खाद्यपदार्थांच्या किमतीपेक्षा विमानतळावर जास्त किमती आहेत, असेही अनेक जणांनी म्हटले आहे. विमानतळावरील खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबतही अनेक प्रवाशांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशांना याच प्रकारचा अनुभव येत असल्याचे समोर आले आहे.
विमानतळातील खाद्यपदार्थांचे दर बाजारभावानुसार आहेत. विक्रेत्यांनी जादा दर आकारल्याचे आढळल्यास कारवाई केली जाईल. याआधीही या विक्रेत्याला १० हजार रुपयांचा दंड केला होता. आता पुन्हा दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल. याचबरोबर स्वस्तातील पिण्याचे पाणी आणि खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्याचे निर्देशही त्यांना देण्यात आले आहेत. सर्व विक्रेत्यांना खाद्यपदार्थांचे दर दर्शनी भागात लावण्याच्या सूचना आहेत.– संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ