न्याहरी व दुपारच्या जेवणानंतर पोट बिघडणे व उलटय़ांचा त्रास सुरू झाल्यामुळे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) २५० छात्रांना गुरूवारी खडकवासला लष्करी रुग्णालयात दाखल करावे लागले. उपचारांनंतर सर्व छात्रांची प्रकृती बरी असून ते आपल्या प्रशिक्षण वर्गात रुजू झाले असल्याची माहिती एनडीएचे संपर्क अधिकारी लेफ्टनंट कमांडंट शिबू देवासिया यांनी दिली. जेवणातील अंडाकरीमुळे छात्रांना विषबाधा झाल्याची जोरदार चर्चा आहे.
एनडीएमध्ये एकूण १९०० छात्र प्रशिक्षण घेत असून, यातील २५० छात्रांना गुरूवारी अपचनाच्या गंभीर त्रासामुळे रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे देवासिया यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘छात्रांना न्याहरी आणि दुपारच्या जेवणानंतर एकामागून एक पोट बिघडणे व उलटय़ांचा त्रास सुरू झाला. सर्व छात्रांवर वैद्यकीय उपचार करण्यात आले असून ते आता बरे आहेत. त्यांच्या रोजच्या अभ्यासवर्गात परत देखील गेले आहेत. सर्व छात्रांना त्रास झाला नसल्यामुळे हे विषबाधेचे प्रकरण वाटत नाही. ज्यांना अपचन झाले त्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.’
गुरूवारी छात्रांनी जेवणात भात, चपाती, डाळ, राजमा आणि अंडाकरी हे पदार्थ खाल्ले होते. यातील अंडाकरी विद्यार्थ्यांना बाधल्याची चर्चा देवासिया यांनी फेटाळली. ते म्हणाले, ‘अंडाकरीमुळे त्रास झाल्याचे वृत्त निराधार असून, अपचनाचे नेमके कारण तपासानंतरच कळेल.’

Story img Loader