लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ विक्रेते ग्राहकांकडून जादा दर आकारत असल्याचे चित्रीकरण विभागीय रेल्वे सल्लागार समितीतील (झेडआरयूसीसी) एका सदस्यानेच गोपनीय पद्धतीने केले. रेल्वेतील अधिकाऱ्यांकडून संबंधित विक्रेत्यांवर तत्काळ ५० हजारांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र, सल्लागार समिती सदस्याकडून असे गोपनीय चित्रीकरण योग्य नसल्याचेही रेल्वेने स्पष्ट केले.

मध्ये रेल्वेच्या पुणे विभागातील मुख्य स्थानकावर खाद्यपदार्थ, पाणी किंवा इतर वस्तूंच्या विक्रीबाबत व्यवस्थापन विभागाकडून दर निश्चित करून देण्यात आले असले, तरी अनेक विक्रेते ग्राहकांकडून अधिक दर आकारतात. तसेच, खासगी विक्रेते बाहेरून येऊन रेल्वेमध्ये आणि स्थानकात व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले आहे. या गैरप्रकारांबाबत रेल्वे प्रवाशांकडून तक्रारीही करण्यात आल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर, रेल्वे विभागातील निमंत्रित सदस्यांपैकी डॉ. आदित्य यांनी स्वतःच ग्राहक म्हणून रेल्वे स्थानकातील काही विक्रेत्यांकडून पाण्याची बाटली आणि इतर साहित्य खरेदी केले. त्यांची विक्री जादा दराने होत असल्याचे चित्रीकरण त्यांनी गोपनीय पद्धतीने केले व ते समाजमाध्यमांवर प्रसारित केले.

याबाबत पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंतकुमार बेहरा यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, ‘पुणे रेल्वे स्थानकावरील विक्रेते ग्राहकांकडून जादा दर आकारून वस्तूंची विक्री करत असल्याचे विभागीय रेल्वे सल्लागार समितीतील सदस्य डॉ. आदित्य यांनी समोर आणले. त्यानुसार संबंधित तीन विक्रेत्यांवर प्रत्येकी ५० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मात्र, रेल्वे सल्लागार समितीतील एखाद्या सदस्याने याची चित्रफीत करून समाजमाध्यमावर प्रसारित करणे चुकीचे आहे. त्यांनी कल्पना देणे आवश्यक होते. या प्रकाराबाबत रेल्वे बोर्डाला माहिती देण्यात आली आहे.’

Story img Loader