पिंपरी : ‘मी इथला गाववाला आहे, मला हप्ता द्यायचा, नाही तर तुम्हाला इथे व्यवसाय करू देणार नाही, अशी धमकी देत खाद्यपदार्थ विक्रेत्यांना मारहाण करून साहित्य रस्त्यावर फेकून दिल्याची घटना वाकड येथे घडली. याप्रकरणी अमोल किसान कलाटे (वय ३८), अविनाश किसान कलाटे (वय ४०, दोघे रा. सुखासा सोसायटी, वाकड) या दोघांना अटक केली आहे. तर, एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सागर अशोक शिंदे (वय ३७, रा. वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘वाकड येथील पदपथावर सागर यांची खाद्यपदार्थांची हातगाडी होती. आरोपी तिथे आले. ‘व्यवसाय करायचा असेल तर हप्ता द्यावा लागेल, म्हणत हप्त्याची मागणी केली. सागर यांनी हप्ता देण्यास नकार दिला. या कारणावरून अमोल याने सागर यांना बेदम मारहाण केली. सागर यांच्या शेजारी असलेल्या बर्गरचा दुकानदार सलमान अन्सारी, पाणीपुरी विक्रेता जितलाल, पुस्तक विक्री करणारा विशाल यांना देखील हप्त्याची मागणी करीत मारहाण केली. तसेच सर्व दुकानांमधील साहित्य रस्त्यावर फेकून हातगाडी आणि खाद्यपदार्थाचे नुकसान केले. अमोल याने ‘मी इथला गाववाला आहे. मला हप्ता द्यायचा. नाही तर तुम्हाला इथे व्यवसाय करू देणार नाही’ असे म्हणून मोठमोठ्याने आरडा ओरडा करून दहशत माजवली’. पोलीस उपनिरीक्षक अतुल जाधव तपास करीत आहेत.