कार्तिकी एकादशी आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदी येथे जाण्यासाठी पीएमपीकडून जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. येत्या गुरुवारपासून (१७ नोव्हेंबर) बुधवारपर्यंत (२३ नोव्हेंबर) ही सेवा उपलब्ध असणार आहे. आळंदीसाठी नियमित मार्गावर धावणाऱ्या ९७ आणि जादा २०३ अशा एकूण ३०० गाड्या धावणार आहेत. दरम्यान, शनिवारपासून (१९ नोव्हेंबर) मंगळवार पर्यंत (२२ नोव्हेंबर) रात्री आवश्यकतेनुसार बससेवा उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.
स्वारगेट, हडपसर, पुणे रेल्वे स्थानक, महापालिका भवन, निगडी, पिंपरी, चिंचवड, देहूगांव, भोसरी, रहाटणी बसस्थानाकातून या गाड्या सुटणार आहेत. यात्रेसाठी रात्री बारा वाजल्यानंतर जादा गाड्यांसाठी (नेहमीची बससेवा संपल्यानंतर) नियमित तिकिटापेक्षा पाच रुपये जास्त आकारले जाणार आहेत.
हेही वाचा: द्रुतगती मार्गावरील अपघात रोखण्यासाठी २४ तास वाहन तपासणी; परिवहन आयुक्तांचे आदेश
पीएमपी प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या एकदिवसी, साप्ताहिक, मासिक, ज्येष्ठ नागरिक आणि अन्य पासधाराकांना यात्रा कालावधीत रात्री बारानंतर पासचा वापर करता येणार नाही. महामंडळाच्या ताफ्यातील गाड्यामधून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे काही मार्गावरील बससेवेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आळंदी येथे जाणारी भोसरी ते पाबळ आणि आळंदी ते मरकळ हे दोन मार्ग यात्रा काळात पूर्णपणे बंद राहणार आहेत, अशी माहिती पीएमपीच्या वाहतूक विभागाकडून देण्यात आली.