पुणे : राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे आकर्षण असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती गटात अव्वल कुस्तीगिरांना समान संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. या वजनी गटाच्या लढती आज संध्याकाळी सुरू होतील. त्यापूर्वी सकाळच्या सत्रात गटातील सर्व मल्लांची वजने आणि वैद्यकीय चाचणी पार पडली. त्याचबरोबर स्पर्धेचा भाग्यांकही (सोडत) काढण्यात आला.
भाग्यांकानुसार गादी विभागातील हर्षवर्धन सदगीर, अक्षय शिंदे, तुषार दुबे हे आव्हानवीर एकाच गटात आले असून, शिवराज राक्षे, पृथ्वीराज पाटील, हर्षवर्धन कोकाटे हे अन्य आव्हानवीर दुसऱ्या गटातून एकत्र आले आहेत. त्यामुळे साखळीतच पुणेकरांना चटकदार लढती बघायला मिळणार आहेत.
माती विभागात पुण्याच्या आशा असलेला दिवंगत मल्ल अमृता मोहोळे यांचा नातू पृथ्वीराज मोहोळ, महेंद्र गायकवाड, शैलेश शेळके हे एका गटात एकत्र आले आहेत. माऊली जमदाडे, तुफानी मल्ल किरण भगत आणि माजी विजेता बाला रफिक शेख हे दुसऱ्या गटात एकत्र आले आहेत.
या गटातील आव्हानविरांच्या वाटचालीविषयी आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच दिनेश गुंड म्हणाले, स्पर्धेच्या भाग्यांकानुसार तरी सर्व मल्लांना समान संधी दिसून येत आहे. आज रात्री पहिली फेरी होईल, तेव्हा चित्र स्पष्ट व्हायला सुरुवात होईल.
हेही वाचा – पुणे : स्वस्त धान्य दुकानांसाठी दुकानदारच मिळेनात, २१८ परवाने मंजूर
प्रतीक, सूरज अंतिम फेरीत
स्पर्धेत गादी विभागातून ८६ किलो गटातून प्रतिक जगतापने अंतिम फेरी गाठली आहे. विजेतेपदासाठी त्याची गाठ उस्मानाबादच्या मुनजीर सरनोबतशी पडेल. प्रतिकने उपांत्य फेरीत एकनाथ बेदरेचा ८-३ असा गुणांवर पराभव केला. मात्र, त्यापूर्वी ओंंकारला तिसऱ्या फेरीत वावरेचा कडवा प्रतिकार सहन करावा लागला. कमालीची वेगवान झालेली ही कुस्ती जवळपास २० गुणांपर्यंत पोहोचली होती. दुहेरी पट आणि भारंदाज डावांचा मुक्त वापर या लढतीत दिसून आला. प्रतिकने ही लढत १७-१३ अशी जिंकली. दुसऱ्या उपांत्य लढतीत मुनजीर सरनोबतने साताऱ्याच्या विजय डोईफोडेचा ५-१ असा पराभव केला.
सूरज अस्वले आणि अतिश तोडकर यांच्यात ५७ किलो वजन गटाची अंतिम लढत होईल. अंतिम फेरीच्या वाटचालीपर्यंत मजल मारणाऱ्या कोल्हापूरच्य सुरजने उपांत्य फेरीत पुणे शहर संघाच्या विजय मोझरचा एकतर्फी लढतीत १०-० असा पराभव केला. बीडच्या अविनाश तोडकरनेही अशीच उपांत्य लढत एकतर्फी जिंकताना सांगलीच्या निनाद बडरेला हरवले.
हेही वाचा – पुणे : कोथरूडमध्ये मोटारीच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
माती विभागातून ८६ किलो वजन गटात भंडाऱ्याच्या अर्जुन काळेने अंतिम फेरी गाठली. विजेतेपदासाठी कत्याची गाठ सचिन पाटीलशी पडेल. उपांत्य फेरीत अर्जुनने नांदेडच्या विजय पवारला चितपट करून लढत जिंकली. सचिनने उपांत्य फेरीत राहुल काळेला ३-१ ने हरवले.