देशातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या वाढत्या शुल्कामुळे ‘एमबीबीएस’ करण्यासाठी रशियाचा रस्ता धरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या दोन वर्षांत प्रादेशिक शिक्षण सल्लागारांच्या मध्यस्थीने रशियाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १५ ते ३५ टक्क्य़ांनी वाढली आहे. यंदा ‘नीट’चा निकाल निराशाजनक लागल्यामुळे या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता शिक्षण सल्लागारांनी वर्तवली आहे.
 गेली ३२ वर्षे भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी रशियाला जात आहेत. कोणत्याही प्रवेश परीक्षेशिवाय प्रवेश, महाविद्यालयाच्या शुल्काव्यतिरिक्त ‘डोनेशन’ किंवा ‘कॅपिटेशन फी’ भरावी न लागणे आणि मुख्य म्हणजे अठरा लाखांत सुमारे सहा वर्षांचा वैद्यकीय शिक्षणाचा अभ्यासक्रम पार पडणे, या गोष्टींमुळे डॉक्टर होऊ इच्छिणारे विद्यार्थी देशी खासगी महाविद्यालयांबरोबरच शिक्षणासाठी रशियाला जाण्याचा विचारही प्राधान्याने करू लागले आहेत.
‘ए. के. एज्युकेशनल कन्सल्टंटस्’ चे डॉ. अमित कांबळे यांनी सांगितले, ‘‘सध्याच्या आकडेवारीनुसार महाविद्यालयीन शुल्क, वसतिगृह शुल्क, वैद्यकीय विमा शुल्क असे खर्च जमेस धरता रशियात शिकणाऱ्या प्रत्येक भारतीय विद्यार्थ्यांस सुमारे तीन ते सव्वातीन लाख रुपये वार्षिक खर्च येतो. या हिशेबाने सहा वर्षांचे शिक्षण सुमारे अठरा लाखांत पूर्ण होऊ शकते. देशातील खासगी महाविद्यालयांच्या तुलनेत हे शुल्क कमी आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी यावर्षी घेण्यात आलेल्या देशपातळीवरील ‘नीट’ परीक्षेत खूपच कमी संख्येने विद्यार्थी पास होऊ शकले आहेत. त्यामुळे शिक्षणासाठी रशियाला जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तरीही या वर्षी डॉलर आणि यूरोच्या मूल्यात सतत होणाऱ्या वृद्धीमुळे निर्माण झालेल्या मंदीसदृश वातावरणामुळे आपल्या पाल्याला परदेशी पाठवावे की नको, अशा द्विधा मन:स्थितीत पालक आहेत.’
भारत आणि रशियाच्या सलोख्याच्या संबंधांमुळे तेथे राहणे विद्यार्थाना सुरक्षित वाटत असल्याचे मत ‘ग्लोबल एज्युकेशनल कन्सल्टन्सी’चे डॉ. सुहास माने यांनी व्यक्त केले. रशियातील वैद्यकीय महाविद्यालये सरकारी असल्यामुळे प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता राहात असल्याचे ते म्हणाले.
रशियातील ‘स्मोलेंक्स स्टेट मेडिकल अॅकॅडमी’त शिक्षण घेणारी सायली वैद्य म्हणाली, ‘‘रशियातील वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा आणि शिस्त चांगली आहे. शिकवलेल्या अभ्यासक्रमावर दर आठवडय़ाला घेतल्या जाणाऱ्या परीक्षा उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक असते. १५- १५ भारतीय विद्यार्थ्यांचे गट करून त्यांना एकाच वर्गात प्रवेश दिला जातो. आपल्याबरोबर शिकणारे बाकीचेही भारतीयच असल्यामुळे एकटेपणाची भावना येत नाही. तेथील स्थानिक रुग्णांशी डॉक्टरांचा सततचा संपर्क असल्यामुळे अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षी रशियन भाषा शिकावी लागते. पण ती शिकायला सोपी असल्यामुळे त्याचे ओझे होत नाही.’’

Story img Loader