नागरी समस्या अलीकडच्या काळात उग्र रूप धारण करत आहेत. अनेकदा तक्रारी होतात, पण समस्या ‘जैसे थे’ राहते. नागरिकांच्या या समस्यांना प्रातिनिधिक व्यासपीठ देऊन त्यांचे गाऱ्हाणे या व्यासपीठावर मांडणारा ‘लोकसत्ता’चा हा पुढाकार

पिंपरी-चिंचवड महापालिकेने २०० काेटींचे कर्जराेखे उभारून हाती घेतलेला मुळा नदी सुधार प्रकल्प विविध कारणांनी वादात सापडला आहे. ‘मुळा नदी सुधार’साठी झालेली वृक्षतोड, नद्यांच्या नैसर्गिक प्रवाहात हस्तक्षेप करून काँक्रीटीकरणावर भर दिला जात असल्याचा दावा करीत पर्यावरणप्रेमी रस्त्यावर उतरले आहेत. मानवी साखळी करून निषेध नोंदवत आहेत. तर, दुसरीकडे नदी सुधार प्रकल्पाच्या कामाचा फायदा घेत नदीतून अवैध वाळू उपसा होत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या वाहतात. पवना नदीची महापालिका हद्दीतील लांबी २४.३४ किलोमीटर, इंद्रायणी नदीची लांबी २०.८५ किलोमीटर आहे. तर, मुळा नदी शहराच्या सीमेवरून दहा किलोमीटर अंतर वाहते. नद्यांची दुरवस्था झाल्याने नदी सुधार प्रकल्प राबविण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहराच्या हद्दीवरून वाहणाऱ्या मुळा नदीचे दोन्ही महापालिकेकडून नदी सुधार प्रकल्पाचे काम सुरू आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने पहिल्या टप्प्यात पिंपळे निलख, विशालनगर येथे नदीकाठावर काम सुरू केले आहे. या कामासाठी विनापरवाना वृक्षतोड झाली आहे. काही झाडे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली आहेत. नदी पात्रात माती, दगड, मुरुम टाकून नदीचे पात्र हे पूर्वीपेक्षा अरुंद केले जात आहे. नैसर्गिक पाण्याचे झरे सुरू न ठेवता नदी पात्रात आठ ते दहा फूट खोल खड्डा खोदून सिमेंट काँक्रीट टाकून सपाटीकरण केले जात आहे. त्याशिवाय नदीतच सिमेंटची भिंत देखील बांधली जात असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे.

उद्यान विभागाने केलेल्या सर्वेक्षणात बारा झाडे तोडली असल्याचे दिसून आले. त्यात काटेरी बाभूळ, सुबाभूळ, उंबर, विलायती चिंच या झाडांचा समावेश आहे. झाडांचा पंचनामा करण्यात आला आहे. तसेच नदीकाठची झाडे ही वादळी-वाऱ्याने पडल्याचा दावा उद्यान विभागाने केला आहे.

नदी सुधार प्रकल्पाचे काम सुरू असताना त्याचा फायदा घेत मुळा नदीतून अवैधपणे वाळू तस्करी केली जात आहे. पिंपळे निलख मुळा नदी परिसरातून अवैधपणे वाळू उपसा करून रात्रीत ट्रॅक्टर, हायवाद्वारे त्याची वाहतूक केली जात असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे युवक शहराध्यक्ष रविराज काळे यांनी केला आहे.

नदी संवर्धनासाठी स्वयंसेवी संस्थांचे आंदोलन

नदी सुधार प्रकल्पाअंतर्गत पर्यावरणावर घाला घातला जात असल्याचा आरोप करून स्वयंसेवी संस्थांनी मानवी साखळी आंदोलन सुरू केले. पिंपळे सौदागर येथे केलेल्या मानवी साखळीत मुले, ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. ‘वृक्षतोड थांबलीच पाहिजे’, ‘आधी नद्या स्वच्छ करा’, आणि ‘नद्या वाचवू, निसर्ग टिकवू’, अशा घोषणा देत नदीसंवर्धनाचा संदेश दिला. पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्यांचे संवर्धन ३० लाखांहून अधिक नागरिकांसाठी महत्त्वाचे असल्याचे आंदोलनकर्त्यांनी अधोरेखित केले. बांधकाम आणि कृत्रिम सौंदर्यीकरणाच्या नावाखाली वृक्षतोड, प्राणी-पक्ष्यांचे अधिवास नष्ट करणे आणि पर्यावरणाला धोका निर्माण करणे हे मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हे आंदोलन प्रदूषणमुक्त नद्यांसाठीच्या मोठ्या मोहिमेचा एक भाग आहे. या प्रकल्पांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊन जैवविविधतेला धोका पोहोचण्याची आणि सार्वजनिक आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची भीती आंदोलकांनी व्यक्त करण्यात केली. नदीकाठी बांधकाम करण्याऐवजी कचरा व्यवस्थापन आणि प्रदूषण नियंत्रण यावर भर द्यावा. मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास लवकरच अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. पुढील टप्प्यात शहरातील वेगवेगळ्या भागांत जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे.

नागरिकांचे म्हणणे काय?

नदी ही माता आहे. तिला सौंदर्य प्रसाधनांची नव्हे, तर आरोग्याची गरज आहे. कर्करोग झाल्यास आपण औषधोपचार करतो, मेकअप नाही. नदीला स्वच्छ करणे आवश्यक आहे. प्रभावी सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) उभारल्याशिवाय हे शक्य नाही. एकेकाळी आम्ही या नद्यांमध्ये पोहत होतो, पण आता त्यांची अवस्था पाहून दुःख होते. पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांचे शुद्धीकरण त्वरित केले पाहिजे, असे पर्यावरणप्रेमी।जॉन डिसोझा म्हणाले.

प्रशासनाचे म्हणणे काय?

वृक्षतोडीबाबत पंचनामा करण्यात आला आहे. झाडे कोणी तोडली हे माहिती नाही. यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलिसांकडून वृक्षतोडीबाबत तपास करून कारवाई केली जाणार आहे, असे सहायक आयुक्त उमेश ढाकणे यांनी सांगितले. तर, मुळा नदीतून वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारींनंतर रात्रीच्या वेळी पथक जाऊन आले. परंतु, वाळू उपसा, उत्तखनन होत असल्याचे दिसून आले नाही. नदीत वाहने उतरण्यासाठीचे रस्ते बंद करण्याची सूचना संबंधित ठेकेदाराला दिली असल्याचे अप्पर तहसीलदार जयराज देशमुख यांनी सांगितले.