पुणे : शालेय शिक्षण विभागातील रिक्त पदांची सूत्रे महसूल आणि अन्य विभागातील अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहेत. रिक्त असलेल्या संचालक, सहसंचालक, विभागीय मंडळ अध्यक्ष आदी पदांवर प्रतिनियुक्ती करण्यात आली असून पहिल्यांदाच महसूल आणि अन्य विभागातील अधिकाऱ्यांकडे शिक्षण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बोगस शिक्षक भरती, टीईटी घोटाळा, बोगस टायपिंग प्रमाणपत्र, सीबीएसई शाळांची बोगस ना हरकत प्रमाणपत्रे, अधिकाऱ्यांवर दाखल झालेले लाचखोरीचे गुन्हे अशा प्रकारांनी शिक्षण विभाग बदनाम झाला आहे. त्यातच शिक्षण विभागातील महत्त्वाची पदे बऱ्याच काळापासून रिक्त आहेत. अतिरिक्त कार्यभाराने या पदांचा कारभार चालवण्याची वेळ आली. मात्र अतिरिक्त कार्यभारामुळे कामकाजावर परिणाम होतो. मार्ग काढण्यासाठी शिक्षण विभागातील रिक्त पदे मंत्रालयील विभागातील सहसचिव, उपसचिव आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांची पदे प्रतिनियुक्तीने भरण्याचा निर्णय फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात आला होता. त्यानुसार १९ रिक्त जागांसाठी इच्छुक अधिकाऱ्यांकडून मागविण्यात आले होते. प्रतिनियुक्तीला शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी विरोध केला होता. मात्र या विरोधाला शासनाने न जुमानता प्रतिनियुक्तीची प्रक्रिया राबवण्यात आली. त्यानुसार महसूल विभागातील पाच, ग्रामविकास विभागातील तीन, मंत्रालयीन आस्थापनेवरील दोन आणि राज्य नियोजन मंडळातील एक या प्रमाणे अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती झाली आहे.

हेही वाचा >>>पुणे: कारखान्यांकडून २४४ कोटी लिटर इथेनॉल निर्मिती; साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक पदी सामान्य प्रशासन विभागातील सहसचिव सं. द. सुर्यवंशी यांची, तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे यांची तीन वर्षासाठी प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त पदी भंडारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, शिक्षण आयुक्तालयातील सहसंचालकपदी अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, प्राथमिक शिक्षण संचालनालयातील सहसंचालकपदी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील सहाय्यक आयुक्त संतोष हराळे, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातील सहसंचालकपदी गडचिरोली जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रशांत शिर्के, पुणे मंडळाच्या अध्यक्षपदी अपर जिल्हाधिकारी मंजूषा मिसकर, नाशिक मंडळाच्या अध्यक्षपदी राज्य नियोजन मंडळाचे विशेष कार्य अधिकारी विजय पोवार, कोल्हापूर बोर्डाच्या अध्यक्षपदी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उदय पाटील, अमरावती मंडळाच्या अध्यक्षपदी अप्पर जिल्हाधिकारी सूरज वाघमारे, आदिवासी विकास आयुक्तालयातील सहआयुक्त पदी वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागातील उपसचिव डॉ. श्रीनिवास कोतवाल आदी अधिकाऱ्यांची एका वर्षासाठी प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: For the first time deputation of officials from other departments including revenue to education department pune print news ccp 14 amy