पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच पोलीस आयुक्तांनी कार्यकाळ पूर्ण केल्याचं पाहायला मिळत आहे. याआधी अंकुश शिंदे यांची कमी कालावधीत उचलबांगडी झाली होती.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची १५ ऑगस्ट २०१८ रोजी स्थापना झाली. पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाल्यानंतर पहिले आयुक्त होण्याचा मान आर.के. पद्मनाभन यांना मिळाला. कालावधी पूर्ण होण्याच्या आधीच बदली झाली. त्यानंतर संदीप बिश्नोई, कृष्ण प्रकाश आणि अंकुश शिंदे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त म्हणून पदभार पाहिला. कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर चारही माजी पोलीस आयुक्तांनी महत्त्वाची कामगिरी केली. सध्याचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या कार्यकाळात अनेक समाज उपयोगी कामे केली आहेत. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये बाल गुन्हेगारी ही कायमची डोकेदुखी होती. पर्याय म्हणून पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी अल्पवयीन गुन्हेगारीत सक्रिय असलेल्या मुलांना पोलिसांकडून फुटबॉलचं विशेष प्रशिक्षण देण्यात आलं. पोलीस कर्मचाऱ्यांसाठी दवाखाना सुरू करण्यात आला. पोलीस आयुक्तालयासाठी चिखलीत नऊ एकर जागा. थेरगाव येथे मुख्यालयासाठी १५ एकर जागा. सायबर गुन्ह्यांची लवकर उकल व्हावी यासाठी पोलीस आयुक्तालयातच सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस आयुक्तांनी किती कार्यकाळ पूर्ण केला?
१) आर.के.पदमनाभन १५ ऑगस्ट २०१८ ते २० सप्टेंबर २०१९
२) संदीप बिष्णोई २० सप्टेंबर २०१९ ते ४ सप्टेंबर २०२०
३) कृष्ण प्रकाश ५ सप्टेंबर २०२० ते २१ एप्रिल २०२२
४) अंकुश शिंदे २१ एप्रिल २०२२ ते १४ डिसेंबर २०२२
- पोलीस आयुक्त विनायकुमार चौबे यांची नियुक्ती १४ डिसेंबर २०२२ रोजी झालेली आहे.