पुणे शहराला काही महिन्यांपासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहराला हक्काचे १६ टीएमसी पाणी मिळाले पाहिजे, या मागणीसाठी काँग्रेसने ग्रामदैवत आणि मानाचा पहिला कसबा गणपतीसमोर भजन आणि आरती करून … हे गणराया, पालकमंत्री गिरीश बापट यांना सुबुद्धी दे! अशी प्रार्थना करण्यात आली. यावेळी बापट यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
पुणेकरांना पाण्यात पाहू नका, हक्काचे पाणी देऊन टाका, जमत नसेल तर राजीनामा द्या, अशा आशयाचे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
काँग्रेसचे शहराध्यक्ष बागवे म्हणाले की, पुणे शहरावर पालकमंत्री गिरीश बापट यांनी कृत्रिम पाणी संकट आणले आहे. धरणात साठा असताना देखील नागरिकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे आज आम्ही कसबा गणपती बाहेर आंदोलन करीत आहोत. जर अशीच परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देखील त्यांनी दिला.
यावेळी आमदार अनंत गाडगीळ, माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे, नगरसेविका सुजाता शेट्टी तसेच आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.