लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये पुण्यातून प्रथमच निवडून गेलेले खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. भाजपसाठी पुणे राज्यातील प्रतिष्ठेची जागा झाली होती. भाजपचे मुरलीधर मोहोळ यांनी या मतदारसंघातून विजय मिळविला होता. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना त्यांनी सुमारे सव्वा लाख मतांनी पराभूत केले होते.
पश्चिम महाराष्ट्रात एका बाजूला सातारा मतदारसंघ सोडून भाजपचे सर्व उमेदवार पराभूत झाले असल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत या भागात पक्षाला उभारी देण्यासाठी मोहोळ यांना मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
आणखी वाचा-पुणे : पार्सल देण्याच्या बहाण्याने सोसायटीच्या सुरक्षारक्षकानेच…
याचमुळे केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन होत असतानाच पुण्यातून मोहोळ यांना संधी मिळेल, अशी चर्चा सुरू झाली होती. भाजपच्या यापूर्वीच्या दोन सरकारमध्ये प्रकाश जावडेकर यांना संधी मिळाली होती. त्यानंतर मोहोळ यांना राज्यमंत्रीपद मिळण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मंत्रिपद मिळाले, तर त्यांना कोणते खाते मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.