पुणे : पुण्यातील फोर्स मोटर्स लिमिटेड ही कंपनी आता भारतीय संरक्षण दलांना फोर्स गुरखा स्पोर्ट युटिलिटी व्हेईकलचा पुरवठा करणार आहे. कंपनीकडून संरक्षण दलांना २ हजार ९७८ गुरखा एसयूव्हींचा पुरवठा केला जाणार आहे. अतिशय दुर्गम भागातही चालू शकतील, अशी त्यांची रचना केलेली आहे.

फोर्स मोटर्सने याबाबतचा कार्यादेश संरक्षण दलांकडून मिळाल्याचे जाहीर केले आहे. फोर्स गुरखाची रचना ही भारतीय लष्कर आणि हवाई दलाच्या गरजा डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली आहे. आव्हानात्मक आणि दुर्गम भागात पोहोचण्यासाठी या एसयूव्ही संरक्षण दलांना मदत करतील. फोर्स मोटर्सने खूप आधीपासून संरक्षण दलांना गुरखा लाइट स्ट्राईक व्हेईकल (एलएसव्ही) चा पुरवठा केला होता. आता कंपनीकडून अत्याधुनिक अशा फोर्स गुरखांचा पुरवठा केला जाणार आहे. या मोटारींचे उत्पादन कंपनीच्या चाकणमधील प्रकल्पात होते.

फोर्स गुरखाची रचना करताना ती दुर्गम भागात चालविता यावी, याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. त्यात अगदी वाळवंटापासून डोंगराळ भागाचा समावेश आहे. अनेक वेळा संरक्षण दलांना अतिशय दुर्गम भागात मोहिमा आखाव्या लागतात. त्याठिकाणी पोहोचणे अवघड असते. अशा मोहिमांमध्ये फोर्स गुरखाचा संरक्षण दलांना फायदा होईल. या मोटारीचे ३ दरवाजे आणि ५ दरवाजे असे दोन प्रकार आहेत. या दोन्ही प्रकारांमध्ये २.६ लिटर टर्बोचार्ज्ड इंटरकूल्ड डिझेल इंजिन आहे.

भारतीय संरक्षण दलांसोबतचा आमचा सहयोग सुरू ठेवणे हे आमच्यासाठी गौरवास्पद आहे. आमची वाहने दर्जा, विश्‍वसनीयता आणि कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करूत निर्माण करण्‍यात आली आहेत. संरक्षण दलांच्या गरजांची पूर्तता ही वाहने करतील.

प्रसन फिरोदिया, व्‍यवस्‍थापकीय संचालक, फोर्स मोटर्स

फोर्स मोटर्सविषयी

एन. के. फिरोदिया यांनी १९५८ मध्‍ये जनतेला किफायतशीर, विश्‍वसनीय आणि कार्यक्षम वाहने पुरविण्‍याच्‍या दृष्टिकोनासह फोर्स मोटर्सची स्‍थापना केली. ही कंपनी आता वाहन निर्मिती, सुटे भाग आणि इंजिन निर्मितीसह विकास आणि संशोधनावर भऱ देत आहे. कंपनीचे देशभरात पाच अत्‍याधुनिक उत्‍पादन प्रकल्प असून १० हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहे. डॉ. अभय फिरोदिया कंपनीचे नेतृत्‍व करत आहेत. कंपनीचे पुण्‍यातील १ हजारांहून अधिक तज्ञांच्‍या रचना पथकाचे पाठबळ असलेले प्रगत विकास व संशोधन केंद्र देशातील सर्वोत्तम केंद्र म्‍हणून ओळखले जाते. मर्सिडीज-बेंझ आणि बीएमडब्‍ल्‍यू यांनी फोर्स मोटर्सला भारतात उत्‍पादित करण्‍यात येणाऱ्या सर्व मोटारी व एसयूव्‍हींसाठी इंजिनची निर्मिती आणि चाचणी करण्‍याची जबाबदारी दिली आहे.