पुणे : तरुणीला धमकावून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या एकाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गुल्हाणी यांनी चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. इस्माइल अब्दुल रेहमान करजगी (वय ४३, रा. सहारानगर, सोलापूर) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे.
करजगीविरुद्ध हवेली पोलीस ठाण्यात २००८ मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. तरुणी आणि करजगी यांची ओळख होती. फेब्रुवारी २००८ मध्ये त्याने बतावणी करून तिला सिंहगड रस्ता भागातील एका सदनिकेत नेले होते. त्याने पीडित तरुणीला धमाकावून तिच्यावर बलात्कार केला होता. छुप्या कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण केले. ध्वननिचित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देऊन तरुणीकडून वेळोवेळी पैसे उकळून तिच्यावर पुन्हा बलात्कार केला होता.
अखेर घाबरलेल्या तरुणीने हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर करजगीला अटक करण्यात आली. त्याच्या विरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. सरकारी वकील ॲड. एस. सप्रे यांनी बाजू मांडली. साक्ष तसेच पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने करजगीला चार वर्षे सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा हवेली पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सतीश पाटील यांनी तपास केला होता.