पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या रिंगरोड प्रकल्पासाठी अमेरिका, सिंगापूर, चीन आणि इतर परदेशी कंपन्यांनी रस दाखविला आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला यापूर्वी दोनदा मुदतवाढ दिली असताना आता पुन्हा २६ एप्रिलपर्यंत निविदा भरण्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते महामंडळाकडून वर्तुळाकार रस्ता हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पूर्व आणि पश्चिम अशा दोन टप्प्यात भूसंपादन करण्यात येत आहे. पश्चिम मार्गासाठी ९० टक्के भूसंपादन पूर्ण करण्यात आले आहे, तर पूर्व मार्गावरील भूसंपादन प्रक्रिया सुरू होताच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने भूसंपादन प्रक्रियेला विराम देण्यात आला आहे.
हेही वाचा : भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?
वर्तुळाकार रस्त्याचे साधारणत: नऊ टप्प्यात काम होणार आहे. त्यानुसार एका टप्प्यासाठी तीन कंपन्यांना काम देण्याचे नियोजन आहे. रस्ते महामंडळाने प्रथम रस्त्याचे काम करणाऱ्या कंपन्यांची पात्रता तपासण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. आता प्रत्यक्ष काम देण्यासाठी कंपनी नेमण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या रस्त्यासाठी अनेक परदेशी कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत. परदेशी कंपन्या असल्यामुळे त्यांनी विनंती केल्यानुसार पुन्हा २६ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे रस्ते महामंडळाकडून सांगण्यात आले. दरम्यान, निविदा भरण्याची मुदत १७ जानेवारी ते १ मार्च अशी देण्यात आली होती. मात्र, या मुदतीत प्रतिसाद कमी मिळाल्याने निविदा भरण्यास २६ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर आणखी काही कंपन्यांनी निविदा भरल्या, तर काही कंपन्यांनी पुन्हा मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केल्याने १६ एप्रिलपर्यंत मुदत वाढविण्यात आली होती. आता पुन्हा ही मुदत २६ एप्रिलपर्यंत करण्यात आल्याचे रस्ते महामंडळाकडून सांगण्यात आले.