पुणे : हवालामार्फत दुबईला परदेशी चलन घेऊन निघालेल्या महिलेसह दोघांना केंद्रीय सीमाशुल्क विभागाच्या पथकाने (कस्टम) पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडले. त्यांच्याकडून चार लाख १०० अमेरिकन डाॅलर जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या परदेशी चलनाचे मूल्य भारतीय चलनात साडेतीन कोटी रुपये आहे. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या एका आरोपीच्या घरातून १७ देशांचे चलन जप्त करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याप्रकरणी खुशबू अगरवाल (वय ४१) आणि मोहम्मद आमीर यांना अटक करण्यात आली आहे. अगरवालने तीन महिलांना दुबईला एक पाकिट पोहचविण्यास सांगितले होते. या पाकिटात अगरवालने काय ठेवले आहे, याबाबतची माहिती महिलांना नव्हती. पुण्यातून दुबईला गेलेल्या तीन महिलांची दुबईतील आंतराष्ट्रीय विमानतळावर तपासणी करण्यात आली. तेव्हा त्यांच्याकडे असलेल्या पाकिटात चार लाख १०० अमेरिकन डाॅलर सापडले. परदेशी चलनबाबात पोलिसांनी विचारणा केली. तेव्हा महिला गोंधळून गेल्या. दुबई विमानतळावरुन त्यांना पुन्हा माघारी पुण्यात पाठविण्यात आले.
पुण्यात आल्यानंतर विमानतळावर तीन महिलांची चौकशी करण्यात आली. चौकशीत अगरवालने पाकिट दिल्याचे माहिलांनी सांगितले. त्यानंतर कस्टमच्या पथकाने अगरवालला ताब्यात घेतले. तिची चौकशी करण्यात आली. तेव्हा मोहम्मद अमिरचे नाव निष्पन्न झाले. कस्टमच्या पथकाने अमिरच्या मुंबईतील निवासस्थानी छापा टाकला. त्याच्या निवासस्थानातून १७ देशांचे चलन जप्त करण्यात आले. कस्टमच्या पथकाने अगरवाल आणि अमिर यांना अटक करुन न्यायालयात हजर केले. सरकारी वकील ऋतुराज वाळवेकर यांनी बाजू मांडली. अगरवाल आणि आमिर यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

हवालामार्फत २० लाख अमेरिकन डाॅलर

आरोपी खुशबू अगरवाल आणि तिचा साथीदार मोहम्मद आमिर यांनी आतापर्यंत २० लाख अमेरिकन डाॅलर दुबईला पाठविल्याचे तपासात उघड झाले आहे. हवालामार्फत पाठविलेल्या अमेरिकन डाॅलरचे मूल्य भारतीय चलनात १६ कोटी ६० लाख रुपये एवढे आहेत. दुबईला १४ ते १५ फेऱ्यांमध्ये हवालामार्फत ही रक्कम पाठविल्याचे उघडकीस आले. आरोपींकडून दिरहम, ऑस्ट्रेलियन डाॅलर, कॅनेडियन डाॅलर, युआन, युरो, पाऊंड,श्रीलंका, न्यूझीलंड, रियाल, थायलंड, दक्षिण आफ्रिकेतील चलन जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती कस्टमच्या अधिकाऱ्यांनी दिली. आमिर याच्या मुंबईतील घरातून १७ देशांतील चलन जप्त करण्यात आले असून, तो मूळचा बिहारमधील दरभंगाचा आहे. सध्या तो मुंबईत वास्तव्यास आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Foreign currency to dubai via hawala from pune pune print news ssb