दोन कोटी रुपयांची उलाढाल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवाळी म्हटले की खमंग चिवडा, खुसखुशीत चकली आणि कडबोळी, मोतीचूर लाडू, रवा आणि बेसन लाडू, अनारसे, गोड आणि खाऱ्या शंकरपाळ्या अशा फराळाच्या पदार्थाची रेलचेल असते. हा दिवाळीचा फराळ देशभरात सर्वत्र तर पाठविला जातोच. पण, परदेशातील मराठी कुटुंबीयांकडूनही फराळाच्या पदार्थाना मागणी वाढली आहे. या वर्षी पुण्यातून सुमारे ३० हजार किलो फराळ जगभरातील विविध देशांमध्ये रवाना होणार असून त्या माध्यमातून दोन कोटी रुपयांची उलाढाल होणार आहे.

गेल्या दशकापासून दिवाळी फराळ देशभरात सर्वत्र जात आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून परदेशातून फराळाच्या पदार्थाना मागणी वाढत आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंग्लंड, सिंगापूर, मलेशिया आणि दुबई या देशांमधून फराळाची मागणी होत आहे. यावर्षी चिवडा, चकली, बेसन लाडू असा तयार फराळ मोठय़ा प्रमाणावर परदेशात रवाना होणार असल्याची माहिती महाराष्ट्र केटिरग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार यांनी दिली.

महिला बचत गटांच्या फराळाला परदेशातून मागणी वाढली आहे. फराळाचे पार्सल कुरीअर कंपन्यांच्या सहकार्याने परदेशात पाठविले जाते. काही कुरीअर कंपन्यांनी केटर्सकडे फराळाच्या पदार्थाची आगाऊ नोंदणी केली आहे. साधारणपणे तीन ते पाच किलो वजन असलेल्या फराळाचे बॉक्स पाठविले जात आहेत. त्यामध्ये शुगर फ्री आणि लो कॅलरी असलेल्या फराळाला तेवढीच मागणी आहे. प्रतिकिलो सहाशे रुपये असा पार्सल पाठविण्याचा दर आकारला जात आहे. पाच दिवस आधी फराळ परदेशी पाठविला तरच तो नरक चतुर्दशीच्या दिवशी लोकांना मिळतो.

तयार फराळाचे पदार्थ घेण्याकडे कल

विभक्त कुटुंब पद्धती आणि गृहिणी नोकरी करणारी असल्यामुळे भाजणी करून दळून आणण्यापासून ते फराळाचे पदार्थ करण्यासाठीचा अवधी महिलांकडे नसतो. त्यामुळे बाजारात मिळणारे आयते पदार्थ घेऊन दिवाळी साजरी करण्याकडे कल वाढला आहे. चकली, चिवडा, लाडू, शंकरपाळी हे पदार्थ वर्षभर मिळत असल्यामुळे दिवाळीचे अप्रूप राहिले नाही. पण, तरी लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये मानाचे स्थान असलेले अनारसे, तसेच चिरोटे, करंज्या आणि मोतिचूर लाडू हे पदार्थ दिवाळीमध्ये भाव खाऊन जातात. सध्या बाजारामध्ये सगळीकडे यंत्रावर बनविलेल्या चकल्या मिळतात. मात्र, दिवाळीमध्ये सोऱ्याने बनविलेल्या हातवळणीच्या चकल्यांना मागणी अधिक असते. त्यामुळे बाजारात तीनशे रुपये किलो दराने चकल्या उपलब्ध असल्या तरी काटा सुटलेल्या हातवळणीच्या चकल्यांसाठी ग्राहक विनातक्रार चारशे रुपये देतात, असे किशोर सरपोतदार यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Foreign demand for diwali faral goods
Show comments