लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : जनावरांच्या खाद्यासोबत भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची तस्करी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या प्रकरणात दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून एक कोटी १९ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बुधवारी दुपारी चारच्या सुमारास बंगलोर-मुंबई महामार्गावर रावेत गावच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणामध्ये विजय चंद्रकांत चव्हाण (वय ५३, रा. सातारा) आणि सचिन निवास धोत्रे (वय ३१ रा. सांगली) अशा दोघांना अटक केली आहे. त्यांना वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता ४ नोव्हेंबरपर्य़ंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
बेंगळुरू-मुंबई महामार्गावरुन विदेशी मद्याची तस्करी होत असल्याच्या मिळालेल्या माहितीवरून राज्य उत्पादन शुल्क विभागाने रावेत गावच्या हद्दीतील एका उपाहारगृहासमोर सापळा रचला. त्यानुसार, पथकाने दुपारी चारच्या सुमारास भारत बेंझ कंपनीचे १४ चाकी वाहन अडवून वाहनाची तपासणी केली. त्यावेळी वाहनात ५० किलो वजनाचे जनावराचे खाद्य भरलेली ८० पोती होती. तर, या पोत्यांच्या खाली गोवा राज्यात निर्मिलेली आणि केवळ गोवा राज्यात विक्रीसासाठी आलेले विदेशी मद्याची खोकी आढळून आली.
कारवाईत ७५० मिली क्षमतेच्या प्रत्येक खोक्यामध्ये १२ बाटल्या या प्रमाणे ४३१ खोकी (५,१७२ बाटल्या), १८० मिली क्षमतेच्या प्रत्येक खोक्यामध्ये ४८ बाटल्या याप्रमाणे ७८५ खोकी (३७,६८० बाटल्या) तसेच ५०० मिली क्षमतेच्या किंगफिशर बिअरची ४० खोकी (९६० बाटल्या) असा एकूण ७४ लाख ५६ हजार २०० रुपयांचा मद्याचा साठा जप्त केला. पथकाने रॉयल ब्ल्यू व्हिस्की, आईस मॅजिक ऑरेंज वोडका आणि रॉयल ब्लंक माल्ट व्हिस्कीच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. मद्य तसेच वाहन असा एकूण १ कोटी १९ लाख ९२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.