पुणे : संयुक्त राष्ट्रसंघाची ७७ वर्षांपूर्वी स्थापना झाली. मात्र सध्याच्या जगाची वास्तविकता संयुक्त राष्ट्रसंघात दिसून येत नाही. एखाद्या कंपनीमध्ये भागधारक बदलतात आणि व्यवस्थापन बदलत नाही. भागधारकांना व्यवस्थापनाने सर्वांना समान न्याय द्यावा असे वाटते, पण जुन्या लोकांना जाऊ द्यायचे नाही. हा वाद सहज सुटण्यासारखा नाही, पण दबाव वाढत आहे, अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थितीवर भाष्य केले.
सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठातर्फे आयोजित ‘जी २० फेस्टिव्हल ऑफ थिंकर्स’ या व्याख्यानमालेत जयशंकर बोलत होते. सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते आदी या वेळी उपस्थित होते.
जयशंकर म्हणाले, जगाला देशाचे वैविध्य दाखवण्यासाठी जी २० ही सर्वांत मोठी संधी आहे. जी २० देशांच्या भारताकडून अपेक्षाही मोठ्या आहेत. भारताचे योगदान, भारताच्या क्षमता, उदार भारत, हायर प्रोफाईल, जबाबदार भारत अशा मुद्द्यांवर भारताकडून अपेक्षा आहेत. जी २० हा केवळ वीस देशांचा समूह नाही, तर या परिषदेचे अध्यक्षपद ही भारतासाठी जागतिक राजकारणातील मोठी संधी आहे. आपण केवळ आपल्या हक्कांसाठी बोलत आहोत असे नाही. तर जगाच्या दक्षिण भागाचा आपण आवाज आहोत.
हेही वाचा – “रोहित पवार हा बिनडोक माणूस”; गोपीचंद पडळकरांची टीका
भारतात अधिकाधिक परदेशी विद्यार्थी यायला हवे आहेत. परदेशी विद्यार्थ्यांना भारतात नोकरी मिळण्याच्या दृष्टीने धोरण तयार करण्यात आहे, असे त्यांनी सांगितले. इलेक्ट्रिक वाहनांकडे सहजपणे संक्रमण होईल यात शंका नाही. मात्र हरित ऊर्जेसाठी लागणाऱ्या निधीचा प्रश्न आहे, असे जयशंकर म्हणाले.