गणांचा अधिपती, बुद्धीचा देव आणि सकल कलांचे दैवत असलेल्या गणरायाच्या अभ्यासाची परदेशी अभ्यासकांनाही भूल पडली आहे. विनायकाचे मूळ रूप आणि त्याचे विविध आविष्कार हा एक केवळ देशातील अभ्यासकांबरोबरच परदेशी अभ्यासकांसाठीही कुतूहलाचा विषय ठरला आहे. विविध देशांमधील अभ्यासकांनी गणपतीचा संशोधनात्मक अभ्यास करून प्रबंधलेखन केल्याची अनेक उदाहरणे आहेत.

नॉर्थ कारोलिना विद्यापीठात भारतीय तत्त्वज्ञान विषयाचे अध्यापन करणारे प्रा. पॉल बी. कोर्टराइट यांनी काही वर्षांपूर्वी गणेश दैवताचा अभ्यास करण्यासाठी पुण्यात सहा महिने मुक्काम केला होता. संस्कृत साहित्यातील संदर्भाच्या आधारे त्यांनी ‘श्री गणेशस्य अ‍ॅनालिसिस’ हा निबंध परदेशातील एका परिषदेमध्ये वाचला होता. श्री गणेशाचे लोकसाहित्यातील स्थान आणि वैदिक काळापासून या देवतेचे विकसित होत गेलेले स्वरूप पाहून त्यांनी ‘गणेश : द लॉर्ड ऑफ अ‍ॅबस्टॅकल अँड बिगिनिंग’ हा ग्रंथ लिहिला, अशी माहिती भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे माजी ग्रंथपाल वा. ल. मंजूळ यांनी दिली.

डॉ. शोवून हिनो या जपानी संशोधक मूळचे नागोया विद्यापीठातील प्राध्यापिका. उपनिषदांवर पीएच.डी. करण्यासाठी त्या १९७९ मध्ये तत्कालीन पुणे विद्यापीठामध्ये आल्या होत्या. हा अभ्यास करताना पुण्यातील गणेशोत्सव आणि विविध मंदिरांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती, ऐतिहासिक गुंडाचा गणपती आणि रँडचा वध करताना चापेकर बंधू यांनी कौल मागितला तो गणेश खिंडीतील पार्वतीनंदन गणेश या मंदिरांचा त्यांनी अभ्यास केला. परत गेल्यानंतर त्यांनी विविध जपानी नियतकालिकांतून लेख लिहिले. गणपतींची छायाचित्रे, नित्योपचार याची भर घालून त्यांनी गणेशावर जपानी भाषेत पुस्तक लिहिले. ऑक्सफर्ड प्रेसने हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. गणेशाचे मूळ स्वरूप, मूर्तिविज्ञान, साहित्यातून आढळणारा इतिहास, शिल्पचित्रांतून दिसणारे प्राचीन स्वरूप आणि नंतरच्या भागात नेपाळ, चीन, तुर्कस्थान, तिबेट, म्यानमार, इंडोनेशिया, जावा, बाली, सुमात्रा या देशात अस्तित्वात असलेल्या दैवतांचा परिचय या ग्रंथात करून देण्यात आला आहे. संस्कृतचा गाढा अभ्यास असलेल्या डॉ. गुद्रन ब्युनमोन या मूळच्या ऑस्ट्रियन विदुषी. १९८५ ते १९९५ या काळात पुण्यात वास्तव्याला असताना धार्मिक विधी, पूजा पद्धती, तांत्रिक मुद्रांचा अभ्यास करून त्यांनी ‘हिंदूू पूजा पद्धती’ आणि ‘रामरक्षा’ यावर त्यांनी विवेचनात्मक ग्रंथ लिहिला. ‘तांत्रिक पद्धतीने गणेश पूजा’, ‘महागणपती पूजा’, ‘फॉम्र्स ऑफ श्री गणेश’ अशा ग्रंथांचे त्यांनी लेखन केले, असेही मंजूळ यांनी सांगितले.

विद्वानांच्या लेखांचा समावेश असलेला  ‘गणेश : स्टडीज ऑफ एशियन गॉड’

कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या कला विभागातील एक संशोधक रॉबर्ट एल. ब्राऊन हे पॅसेफिक एशिया म्युझियममध्ये क्युरेटर. गणेश दैवताच्या अभ्यासाची गोडी त्यांना निर्माण झाली. १९९२ मध्ये न्यूयॉर्क स्टेट युनिव्हर्सिटीमधून ‘गणेश : स्टडीज ऑफ एशियन गॉड’ हा अभ्यासपूर्ण ग्रंथ त्यांनी संपादित केला. यामध्ये त्यांनी लुडो रेशेर (संस्कृत साहित्यातील गणेश), डॉ. फलिया ग्रनोफ (मुद्गल पुराण आणि गणेश प्रतिमा), लॉरेन्स फोहेन (गणेशाच्या स्त्रिया), अ‍ॅमी कॅटलॉन (वातापि गणपती), रॉबर्ट ब्राऊन (पूर्व एशियातील गणेश), ख्रिस्तोफर विलकिन्सन (तांत्रिक गणेश), लेविस लॅन कास्टर (चायनातील गणेश) आणि जेम्स सॅनफोर्ड (जपानमधील गणेश) असे तज्ज्ञांचे गणेशविषयक लेख प्रसिद्ध केले आहेत, असेही वा. ल. मंजूळ यांनी सांगितले.